१५ वर्षांपूर्वी दोन महिला अनुयायांवरील बलात्काराप्रकरणी ‘डेरा सच्चा सौदा’चा प्रमुख गुरमित राम रहिम सिंगला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवत २० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. हा वादग्रस्त मुद्दा असल्याने चित्रपटसृष्टीतील बऱ्याच कलाकारांनी यावर बोलणं टाळलं. मात्र शाहरुख खानने न्यायालयाच्या या निकालावर आनंद व्यक्त केला.

शाहरुख ‘टेड टॉक्स : नयी सोच’ या टॉक शोच्या शूटिंगमध्ये व्यग्र असताना त्याला बाबा राम रहिमला न्यायालयाने शिक्षा सुनावल्याची बातमी कळली. यावेळी शूटिंगदरम्यान माईक घेऊन तो म्हणाला की, ‘हा शोचा भाग नसल्याने कदाचित दिग्दर्शकांना मी जे करतोय ते आवडणार नाही. राम रहिम सिंगला बलात्कारप्रकरणी शिक्षा सुनावल्याने मला आनंद झाला.’ मात्र शाहरुखचं हे वक्तव्य त्याच्या टॉक शोमध्ये दाखवणार नसल्याचा निर्णय वाहिनीने घेतल्याचं म्हटलं जातंय. हा शो प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय व्हिडिओ सीरिज ‘टेड टॉक्स’चा टेलिव्हिजन व्हर्जन आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील लोक अनेक मुद्द्यांवर चर्चा करतात.

वाचा : बाबा राम रहिम यांचे वार्षिक उत्पन्न माहितीये का?

दरम्यान अभिनेत्री ट्विंकल खन्नानेही तिच्या ‘मिसेस फनीबोन्स’ या ब्लॉगमधून बाबा राम रहिमवर उपरोधिक टीका केली होती. ‘आपल्या देशात जितके खड्डे आहेत तितकेच बाबा आहेत. मात्र आपल्यामुळे त्यांचं अस्तित्व असल्याने दोषी आपणच आहोत. एखादा बाबा चुकीचा आहे हे समजल्यानंतर आपण लगेच दुसऱ्या बाबाकडे पळतो,’ असं तिने ब्लॉगमध्ये लिहिलं होतं.