बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी ‘झिरो’ सिनेमाच्या पोस्ट प्रोडक्शनच्या कामात व्यग्र आहे. आनंद एल राय दिग्दर्शित या सिनेमात तो एका बुटक्या माणसाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. सिनेमात त्याच्यासोबत कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याआधीही या त्रिकुटाने ‘जब तक है जान’ सिनेमात एकत्र काम केले होते, त्यामुळे ‘झिरो’ सिनेमाच्या सेटवर हे तिघंही खूप मजा- मस्ती करताना दिसतात. नुकताच शाहरुख कतरिनाच्या फोटोसोबत मस्ती करताना दिसत आहे. किंग खानने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे.

या फोटोत शाहरुखने हुबेहुब त्याच्या ‘डर’ सिनेमासारखा एक सीन दिला आहे. या दोन फोटोंमध्ये फरक फक्त इतकाच आहे की, ‘डर’ सिनेमात शाहरुख जुही चावलाच्या फोटोसमोर उभा होता तर आता तो कतरिनाच्या फोटोसमोर उभा आहे. ‘डर’ सिनेमात शाहरुख आपल्या मनातील भावना जुही चावलासमोर बोलून दाखवताना दिसत आहे. तर या फोटोमध्ये शाहरुख हातात आइस्क्रिम घेऊन उभा आहे. या फोटोला कॅप्शन देताना सुपरस्टार म्हणाला की, ‘ती आइस्क्रिम खात नाही. कारण तिला खूप मेहनत घ्यायची असते. हीच ती भिती आहे. आय लव्ह यू ककककक कतरिना… ‘

कतरिनासोबतचा फोटो शेअर केल्यानंतर शाहरुखच्या चाहत्यांनी डर सिनेमातील फोटो आणि या फोटोचे कोलाज बनवून तो फोटो शेअर करायला सुरूवात केली. शाहरुखने फोटो शेअर केल्यानंतर कतरिना तरी कशी शांत बसेल. कतरिनानेही शाहरुखच्या या फोटोला उत्तर देणारा एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला. या फोटोत कतरिना आणि शाहरुख एकमेकांच्या मिठीत दिसत असून, कतरिनाने ‘आइस्क्रिमनंतर’ असं अनोखं कॅप्शन दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, झिरो सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर, काही दिवसांपूर्वी शाहरुखच्या या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. शाहरुखच्या चाहत्यांना हा टीझर पसंत पडला असून आता ते या सिनेमाच्या ट्रेलरची वाट पाहत आहेत. याच वर्षी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.