बॉलिवूडमधील ‘खान’दान म्हटलं की दिवाळी, ख्रिसमसला येणारे त्यांचे धमाकेदार चित्रपट आठवतात. शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान ही नावंच प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत खेचण्यास पुरेशी आहेत असा समज होता. पण सध्या हे चित्र बदलतंय. सुपरस्टारसोबतच प्रेक्षकांना दमदार कथा, आशयघन चित्रपट हवा आहे. याची प्रचिती शाहरुखच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’ चित्रपटावरून येते. शाहरुख, अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ अशी स्टारकास्ट यामध्ये आहे. पहिल्या दिवशी हा चित्रपट घसघशीत कमाई करेल असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषकांनी वर्तवला होता. पण हा अंदाज साफ खोटा ठरला. पहिल्या दिवशी ‘झिरो’ने फक्त २०.१४ कोटी रुपये इतकाच गल्ला जमवला. ख्रिसमसला प्रदर्शित झालेल्या गेल्या तीन वर्षांतील हा सर्वांत कमी कमाईने ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे.
गेल्या वर्षी ख्रिसमसला सलमान खानचा ‘टायगर जिंदा है’ प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी त्याने ३४.१० कोटी रुपये कमावले होते. त्याआधी २०१६ मध्ये आमिर खानच्या ‘दंगल’ने पहिल्या दिवशी २९.७८ कोटींचा गल्ला जमवला होता. इतकंच नव्हे तर २०१५ मध्ये शाहरुखच्या ‘दिलवाले’ने २१ कोटींच्या कमाईने ओपनिंग केली होती.
#Zero slips on Day 2… Biz should’ve witnessed solid growth on Day 2 after an underwhelming Day 1, but is struggling at the BO… Decline on Day 2 [vis-à-vis Day 1]: 9.53%… Fri 20.14 cr, Sat 18.22 cr. Total: ₹ 38.36 cr. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) December 23, 2018
‘झिरो’ आणि त्याआधीचे दोन-चार चित्रपट पाहता आता बॉलिवूडच्या किंग खानची जादू ओसरत चालली आहे का असा प्रश्न उपस्थित होतो. म्हणूनच कदाचित ‘झिरो’ हिट नाही झाला तर मला पुढील सहा ते दहा महिने काम मिळणार नाही अशी चिंता स्वत: शाहरुखलाही सतावत होती.