अभिनेता शाहिद कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘कबीर सिंग’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन महिना उलटला तरी त्याबाबत मतभेद अद्याप सुरूच आहेत. हा चित्रपट स्त्रियांविरोधातील वृत्तीला प्रेरणा देणारा असल्याचा आरोप काहींनी केला आहे. या टीकांवर शाहिदने मौन सोडलं आहे.

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत कबीर सिंगच्या भूमिकेबद्दल शाहिद म्हणाला, ‘कबीर सिंगच्या भूमिकेला वेगवेगळे पैलू आहेत. काही त्रासदायक आणि भयानकसुद्धा आहेत. तर काही सकारात्मक गोष्टीसुद्धा आहेत. कबीर सिंगचा राग फक्त महिलांसाठी किंवा मुलींसाठी नाहीये. त्याच्या व्यक्तीमत्त्वातच तो राग आहे आणि तो फक्त स्त्रियांसाठीच आहे असं अजिबात चित्रपटात दाखवलं नाहीये.’

यावेळी शाहिदने अभिनेता संजय दत्तच्या बायोपिकचाही उल्लेख केला. ‘याआधी असे बरेच चित्रपट प्रदर्शित झाले आहेत ज्यांमधील भूमिका वादग्रस्त होत्या. पण तेव्हा अशाप्रकारे टिकाटीप्पणी किंवा ट्रोलिंग झाली नव्हती. संजू या चित्रपटातील नायक पत्नीसमोर स्पष्टपणे सांगतो की त्याने ३०० महिलांसोबत सेक्स केलं आहे. लोकं कबीर सिंगच्या मागे ज्याप्रमाणे टीका करण्यासाठी धावत आहेत तसं त्यांनी ‘संजू’च्या बाबतीत का नाही केलं,’ असा सवाल त्याने उपस्थित केला.

‘संजू’बाबत प्रश्न उपस्थित करत असतानाच त्याने तो चित्रपट एन्जॉय केल्याचंही सांगितलं. ‘लोकांनी कसं वागलं पाहिजे यासाठी मी तो चित्रपट पाहिला नव्हता. पण एखादं पात्र कसं असतं हे जाणून घेण्यासाठी तो चित्रपट मी पाहिला होता,’ असं तो म्हणाला.

‘कबीर सिंग’ने बॉक्स ऑफीसवर कमाईचा २५० कोटींचा आकडा पार केला आहे. यामध्ये शाहिदसोबत अभिनेत्री कियारा अडवाणीची मुख्य भूमिका आहे. तेलुगू चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा हा हिंदी रिमेक आहे.