दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अभिनेता शाहिद कपूरने त्याच्या चाहत्यांना एक भेट दिली आहे. त्याच्या आगामी ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटाचा टीझर आज प्रदर्शित झाला आहे. शाहिदने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर हा टीझर पोस्ट केला आहे. अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकरच्या सुपरहिट ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ या चित्रपटानंतर निर्माती प्रेरणा अरोरा आणि दिग्दर्शक श्री नारायण सिंग शाहिदचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत.
सुरुवातीला ‘रोशनी’ असं तात्पुरतं नाव या चित्रपटासाठी सुचवण्यात आलं होतं. ‘बत्ती गुल मीटर चालू’ हे शीर्षक दिग्दर्शक श्री नारायण सिंग यांनीच निश्चित केलं आहे. या शीर्षकावरूनच चित्रपटाचा विषय सहज समजण्यासारखा आहे. वीज वितरण कंपन्यांचा अनागोंदी कारभार आणि वीजचोरी हे प्रश्न यामध्ये उचलण्यात येणार आहेत. ग्रामीण भाग आणि छोट्या शहरांत सर्रासपणे होणाऱ्या वीजचोरीचा मुद्दा या चित्रपटात मांडण्यात येणार आहे.
Let’s celebrate the festival of light with the hope that soon electricity will be a right and not a privilege for all. #BattiGulMeterChalu #ShreeNarayanSingh @kriarj @TSeries https://t.co/Kdrm9AXRkr
— Shahid Kapoor (@shahidkapoor) October 19, 2017
शाहिदसोबत कोणती अभिनेत्री यामध्ये भूमिका साकारणार हे अद्याप निश्चित झाले नसून कतरिना कैफची वर्णी लागू शकते असं म्हटलं जात आहे. पुढच्या वर्षी जानेवारीपासून चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात होणार आहे.
वाचा : आमिरशी घेतला पंगा; केआरकेचं ट्विटर अकाऊंट बंद
त्यापूर्वी शाहिदचा ‘पद्मावती’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटात तो राजा रावल रतन सिंहची भूमिका साकारणार आहे. यामध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणचीही मुख्य भूमिका आहे.