बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये शाहिद कपूरचे नाव घेतले जाते. ‘इश्क विश्क’ने चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्याने ‘कमिने’, ‘रंगून’, ‘हैदर’, ‘उडता पंजाब’ यांसारख्या अनेक विविध धाटणीच्या चित्रपटांमध्ये काम केले. शाहिदच्या कारकिर्दीप्रमाणेच त्याचे वैयक्तिक आयुष्यही चर्चेचा विषय राहिले. आजच्या घडीला शाहिद मीरा राजपूत हिच्यासह सुखाने वैवाहिक आयुष्य जगत असला तरी एकेकाळी या अभिनेत्याला प्रेमाच बऱ्याच खस्ता खाव्या लागल्या होत्या.

वाचा : ‘रस्त्यावरुन जाणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीने मला चिमटा काढला होता’

गेल्याच आठवड्यात शाहिद आणि मीरा एका चॅट शोमध्ये उपस्थित राहिले होते. यावेळी त्याने आपल्या आयुष्याविषयी अनेक खुलासे केले. त्याच्यासोबत काम करणाऱ्या दोन सहअभिनेत्रींच्या तो प्रेमात पडला होता, असेही त्याने म्हटले. इतकेच नव्हे तर एका प्रसिद्ध अभिनेत्रीने त्याला प्रेमात दगा दिल्याचेही तो म्हणाला, असे ‘मुंबई मिरर’च्या वृत्तात म्हटले आहे. शाहिद आणि करिना कपूरमध्ये असलेले प्रेमसंबंध सर्वांनाच माहिती आहेत. मात्र, कुठे माशी शिंकली कोणास ठाऊक ‘जब वी मेट’च्या चित्रीकरणावेळी त्यांचा ब्रेकअप झाला. पण दोघांनीही त्यांच्या ब्रेकअपबद्दल नंतर काहीच वाच्यता केली नाही. त्यावेळी करिनाने ‘टशन’मधील तिचा सहकलाकार सैफ अली खानसाठी शाहिदला फसवल्याची चर्चा होती.

या चॅट शोमध्ये मीरा मात्र तिच्याच धुंदीत दिसली. यावेळी कोणतेही आढेवेढे न घेता ती प्रत्येक प्रश्नाचं उघडपणे उत्तर देत होती. बॉलिवूडमधील कोणत्या अभिनेत्रीला स्टायलिस्टची गरज आहे, असा प्रश्न शोची सुत्रसंचालक नेहा धुपियाने मीराला केला. त्यावर तिने लगेच विद्या बालनचे नाव घेतले.

TOP 10 NEWS वाचा : चित्रपटांच्या प्राईम टाइम वादापासून अनुष्काच्या गृहप्रवेशापर्यंत

शाहिद लवकरच दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ चित्रपटात महारावल रतन सिंहच्या भूमिकेत दिसेल. याव्यतिरिक्त तो श्री नारायण सिंहच्या ‘बत्ती गुल मीटर चालू’च्या चित्रीकरणाला पुढच्या महिन्यापासून सुरुवात करेल. या चित्रपटानंतर शाहिद पुन्हा एकदा ‘जब वी मेट’ फेम दिग्दर्शक इम्तियाज अली याच्यासोबत काम करताना दिसेल.