बॉलिवूड बादशहा शाहरुख खानच्या रईस चित्रपटातील ‘ओ जालिम..’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. आरिजीत सिंग आणि हर्षदीप कौर यांच्या आवाजातील या गाण्यामध्ये शाहरुख खान पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान सोबत रोमान्स करताना दिसत आहे. शाहरुखच्या चेहऱ्यावरील भाव आणि माहिराची अदा या गाण्याची उत्सुकता वाढविणारी अशी आहे. ज्यांना गाण्याची आवड नसेल त्यांना देखील ‘जालिमा..’ हे गाणे गुणगुणायला लावेल, असा विश्वास व्यक्त करत यापूर्वी शाहरुखने गाण्याचा टिझर ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला होता.

शाहरुख खानचा आगामी ‘रईस’ चित्रपट अनेक कारणांनी चर्चत आला आहे. या चित्रपटामध्ये पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही ती बऱ्याच वेळासाठी दिसली होती. पाकिस्तानी कलाकारांविरोधातील चर्चेमध्ये माहिरा खान चांगलीच चर्चेत आली आहे. ‘रईस’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या मार्गावर असताना काही दिवसांपूर्वी ट्विटरवर माहिराचा २०११ साली प्रदर्शित झालेल्या एका कार्यक्रमातील व्हिडिओ व्हायरल झाला होता. पाकिस्तानी विनोदवीर ओमर शरीफच्या चॅट शो दरम्यान माहिरा ‘तुम्ही भारतापासून कधीच प्रोत्साहित होऊ नका. आपण बॉलीवूडमधील नाही आहोत’. असे बोलताना दिसली होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओनंतर शाहरुखसोबतच्या माहिराच्या रोमान्सला कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणे देखील औत्सुकतेचे ठरणार आहे.

यापूर्वी शाहरुख खानच्या बहुर्चित चित्रपटाचे लैला…हे गाणे प्रदर्शित झाले होते. या गाण्याच्या माध्यमातून बेबे डॉल सनी लिओनीने पहिल्यांदा शाहरुखसोबत स्क्रिन शेअर केली होती. या गाण्याला चांगली लोकप्रियता मिळाल्याचे देखील पाहायला मिळाले होते. तसेच सनी लिओनीच्या ठुमक्यांनी साकारलेले गाणे यंदाच्या वर्षातील सर्वाधिक धमाकेदार गाणे असेल अशा चर्चाही रंगल्या होत्या.

‘रईस’ हा चित्रपट गुजरातच्या दरियापूरमधील अवैध दारुचा व्यवसाय करणाऱ्या अब्दुल लतीफच्या जीवनावर आधारित आहे. अब्दुल लतीफ हा दाऊच्या जवळचा व्यक्ती होता. छोटे मोठे अवैध धंदे करणारा अब्दुल अंडरवर्ल्डचा डॉन कसा झाला या भोवती चित्रपटाचे कथानक फिरताना दिसणार आहे.  २५ जानेवारीला चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता. ‘रईस’ आणि ‘काबिल’ हे दोन्ही चित्रपट आता एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत.