बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खान याला गुरूवारी संध्याकाळी अमेरिकेच्या लॉस एंजलिस विमानतळावर इमिग्रेशन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ताब्यात घेण्यात आले. यावेळी शाहरूख खानची अनेक तास चौकशी करण्यात आली. या सर्व प्रकाराबद्दल स्वत: शाहरूख खान याने ट्विटरच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे. सध्या जगातील परिस्थिती पाहता असलेली सुरक्षाव्यवस्थेची गरज मी समजू शकतो, मी त्याचा आदरही करतो. मात्र, अमेरिकच्या इमिग्रेशन विभागाकडून प्रत्येकवेळी ताब्यात घेतले जाणे हे खूपच उद्वेगजनक असल्याची प्रतिक्रिया शाहरूख खानने व्यक्त केली आहे. मात्र, संतापाबरोबरच शाहरूख खानने आपल्या मिष्किल स्वभावानुसार या प्रकारवर मजेशीर टिप्पणी केली आहे. चौकशीच्या काळात मला विमानतळावर चांगले पोकेमॉन्स सापडले, असे शाहरूखने ट्विटमध्ये म्हटले आहे.
शाहरूख खानला अमेरिकन इमिग्रेशन विभागाने अशाप्रकारे ताब्यात घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०१२ मध्ये न्यूयॉर्क विमानतळावर त्याची अशाचप्रकारे दोन ते तीन तास चौकशी करण्यात आली होती. एका मुलाखतीत त्याने याबद्दल संतापही व्यक्त केला होता. मला अमेरिकन अधिकाऱ्यांविषयी द्वेष नाही. मात्र, कोणत्याही कारणाशिवाय अशाप्रकारे रोखून धरणे अस्वस्थ करणारे असल्याचे शाहरूखने म्हटले होते.