ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं आज (७ जुलै) निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे दिलीप कुमार यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधून शोक व्यक्त होत असून, दिलीप कुमार यांच्याबद्दलच्या आठणवींना पत्रकार शैलेश गुजर यांनी उजाळा दिला आहे. गुजर यांनी भावूक होत दिलीप कुमार आणि पुणे शहर यांच्यामधील अनोख्या नात्याबद्दलच्या स्मृती उलगडल्या…

पुणे वृत्त दर्शनचे संपादक शैलेश गुजर यांनी दिलीप कुमार यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्यांनी दिलीप कुमार यांना “पुणे शहरांविषयीचं तुमचे काय मत आहे?” असा प्रश्न विचारला होता. त्यावर थोडा विचार करुन, दोन मिनिटांनी दिलीप कुमार यांनी उत्तर दिलं होतं.

शैलेश गुजर यांना उत्तर देत दिलीप कुमार म्हणाले होते, “इस पुणे सिटीने मुझे जिंदगी मे पहले सौ रुपये कमाने का मौका दिया है!” त्यांचं उत्तर ऐकून शैलेश यांना काहीच कळलं नाही. शैलेश यांच्या चेहऱ्यावरचे प्रश्नार्थ भाव पाहून ते म्हणाले, ‘बेटा सुनो आपका जन्म नही हुआ था, १९४० में मैने पुने कॅम्प मे आर्मी के कॅन्टीन के बाहर सॅन्डविच का स्टॅाल लगाया था। पिताजीसे झगडा करके पुना आया था। राजकपुर मेरा बचपन का साथी है, वो जब भी पुना आता मुझे मिलने, स्टॉल पर जरुर आता था! पुना के प्यारे लोग, शहरकी हवा, खुला आस्मान, खडकवास डॅम, बंडगार्डन, मेन स्ट्रीट, शहर की सभ्यता, शिक्षा और संस्कृत का शहर. और सायकल मुझे बोहोत पसंद है!’

शैलेश यांच्याशी बोलताना दिलीप कुमार म्हणाले, “आर्मी कॅन्टीन सॅन्डविच स्टॅाल लावून मी पाच हजारांची बचत केली, सेव्हिंग केली आणि मुंबईला परत गेलो. त्या कॅन्टीनमधून मी जेव्हा पहिल्या १०० रुपयाचे सेव्हिंग केले तो दिवस माझ्या कायम स्मरणात आहे. कारण तो दिवस पुण्यातला होता, मला आयुष्यात स्व कमाईचा आनंद याच पुणे शहराने दिला आहे,” असं उत्तर दिलीप कुमार यांनी त्या मुलाखतीत दिलं होतं.