‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ असं भारदस्त आवाजात म्हणणारे अभिनेते शरद पोंक्षे यांनी त्यांचे ‘हे राम.. नथुराम’ नाटक कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या महिन्याभरात या नाटकाचे शेवटचे १० प्रयोग महाराष्ट्रभर होणार आहेत. मार्चच्या पहिल्या आठड्यात शेवटचे ‘हे राम’ म्हणत ‘नथुराम गोडसे’ शांत होणार आहे. शरद यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून यासंबंधीत माहिती दिली.
‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ आणि नंतर ‘हे राम.. नथुराम..’ या नाटकासोबतचा शरद यांचा २० वर्षांचा प्रवास अविस्मरणीय आहे. २० वर्षांनंतरही या नाटकाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली नाही. आजही अनेक ठिकाणी या नाटकाला हाऊसफुल्लची पाटी लागते. असे असतानाही अचानक नाटक का थांबवलं असा प्रश्न या नाटकांच्या चाहत्यांना पडला. या प्रश्नाचे उत्तर देताना पोंक्षें म्हणाले की, ‘कोणत्याही कलाकृतीची थांबायची एक वेळ ठरलेली असते. रसिकांनी नाटक केव्हा बंद करताय असा प्रश्न विचारण्याआधी का बंद करताय असा प्रश्न विचारावा. एखादी कलाकृती जीर्ण होईपर्यंत वाट बघू नये. ती टवटवीत, ताजी आणि लोकांना हवीहवीशी वाटत असतानाच थांबवण्यात मजा आहे. या भूमिकेने सर्वांना आनंदच दिलाय. ज्यांनी पाहिले त्यांना आनंदच मिळाला. नाहीतर २० वर्ष ही भूमिका मी करूच शकलो नसतो. आता हे नाटक बंद केल्यामुळेही कित्येकांना आनंदच मिळणार आहे. त्यातही मला आनंदच आहे. तेव्हा हा आनंददायी प्रवास मनात साठवून हे राम नथुराम नाटकाला पुर्ण विराम देत आहे.’
प्रेक्षकांमध्ये हे नाटक जेवढं लोकप्रिय होतं तेवढाच या नाटकाचा आतापर्यंतचा प्रवास कठीण होता. सुरुवातीपासूनच हे नाटक वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. नाटक बंद करण्याचे कारण सांगातना शरद पोंक्षे म्हणाले, ‘नाटक बंद करण्याचे पहिले आणि महत्त्वाचे कारण म्हणजे वय. नथुराम फासावर चढला तेव्हा त्याचे वय ३९ होते आणि माझे वय आता ५२ आहे. मी वयाच्या ५२ वर्षांपर्यंत नथुरामची भूमिका खेचली. प्रेक्षकांवर एकप्रकारे लादली. पण आता थांबावे असेच वाटते.’
पुन्हा या भूमिकेत शदर पोंक्षे दिसणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले. अगदी लोकाग्रहास्तवही ते १० प्रयोगांपर्यंत एकही प्रयोग करणार नाहीत. प्रत्येक रंगमंदिरात एक शेवटचा प्रयोग करायचा त्यांचा मानस आहे. तर तुम्हालाही हे नाटक शेवटचे पाहायचे असतील तर ही शेवटची संधी सोडू नका.