बॉलिवूडमध्ये आपल्या हरहुन्नरी अभिनयाने आणि आपल्या हॅण्डसम लूकने मोहिनी घालणारे ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे ४ डिसेंबरला दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शशी कपूर यांच्या निधनाची वार्ता कळताच संपूर्ण बॉलिवूड दुःख सागरात लोटले. कपूर परिवाराला भेटण्यासाठी अनेकांनी त्यांचे घर गाठले. शशी कपूर यांच्या अंत्यविधीवेळी करिश्मा कपूर, करीना कपूर, ऋषी कपूर, रणबीर कपूर, संजना कपूर, सैफ अली खान सारेच कपूर कुटुंबीय एकत्र दिसले.
यादरम्यान, कपूर कुटुंबीयांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोमध्ये शशी कपूर यांच्यासमवेत संपूर्ण कपूर कुटुंबीय एकत्र दिसताहेत. संपूर्ण कपूर कुटुंब एकाचवेळी भेटणं हे फार कमी वेळा होतं. त्यामुळेच या फोटोकडे दुर्मीळ फोटो म्हणून पाहिले जाते. या फोटोत शशी कपूर मध्यभागी बसलेले आहेत. तर त्यांच्या आजूबाजूला संपूर्ण परिवार दिसतो. यात ऋषी कपूर, रणबीर कपूर, करिश्मा कपूर, कुणाल कपूर, नीतू कपूर, रणधीर कपूर, बबिता कपूर, राजीव कपूर आणि इतर कुटुंबीय दिसत आहेत. गेल्या वर्षी करिश्मा कपूरने हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. नाताळच्या दरम्यान संपूर्ण कपूर कुटुंबीय एकत्र आले होते.
शशी कपूर यांनी १९५० मध्ये ब्रिटिश अभिनेत्री जेनिफर केंडलशी लग्न केले होते. लग्नाच्या वेळी ते फक्त २० वर्षांचे होते. जेनिफर आणि शशी यांना कुणाल, करण आणि संजना ही तीन मुलं आहेत. सुरूवातीला जेनिफर आणि शशी मिळून पृथ्वी थिएटरचा कार्यभार सांभाळायचे. पण जेनिफर यांच्या निधनानंतर मुलगा कुणालने थिएटरची सूत्रं आपल्या हाती घेतली. पण त्यानंतर १९९० मध्ये इतर कामांमध्ये व्यग्र असल्यामुळे कुणालने ही जबाबदारी बहीण संजनाकडे सोपवली. काही वर्षांनी संजनाचे दिल्लीस्थित मुलाशी लग्न झाले आणि पृथ्वी थिएटरची जबाबदारी पुन्हा एकदा कुणालच्या खांद्यांवर आली. कुणाल सध्या जाहिरात क्षेत्राशी निगडीत आहे तर छोटा मुलगा करण कपूर एक छायाचित्रकार आहे.