ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ६० आणि ७० च्या दशकात त्यांनी सिनेसृष्टीत एकहाती अधिराज्य गाजवले होते. त्याचे रुपेरी पडद्यावरचे आयुष्य साऱ्यांनाच माहित असले तरी पडद्यामागे ते कसे होते हे फारसे कोणालाही माहित नाही… चला तर मग त्यांच्या आयुष्यातील फारशा माहित नसलेल्या गोष्टींवर आज नजर टाकूया…
सिनेसृष्टीचे पितामह अशी ओळख असलेल्या पृथ्वीराज कपूर यांच्या घरी १८ मार्च, १९३८ मध्ये शशी कपूर यांचा जन्म झाला. पृथ्वीराज यांच्या चार मुलांपैकी शशी हे सर्वात धाकटे होते. त्यांच्या आईचे नाव रामशरणी कपूर होते. आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेल्या शशी कपूर यांचे मूळ नाव बलबीर राज कपूर असे होते.
लहानपणापासूनच अभिनयाची आवड असणाऱ्या शशी यांना शाळेतील नाटकांत काम करण्याची इच्छा होती. पण त्यांची ही इच्छा तेव्हा पूर्ण होऊ शकली नाही. पण त्यांना नाटकांत काम करण्याची संधी पृथ्वी थिएटरमध्ये मिळाली.
१९४४ मध्ये त्यांनी पृथ्वी थिएटरमधून शकुंतला या पहिल्या नाटकातून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरूवात केली. सिनेमांतही त्यांनी एक बालकलाकार म्हणून अभिनय करायला सुरूवात केली होती.
लग्नाच्या बाबतीही ते इतर कपूरपेक्षा वेगळे होते. पृथ्वी थिएटरमध्ये काम करत असताना, भारत दौऱ्यावर आलेल्या गोदफ्रे कँडल यांच्या थिएटर ग्रुपच्या शेक्सपियेराना या ग्रुपसोबत काम करण्यास सुरूवात केली होती. या ग्रुपसोबत काम करताना त्यांनी जगभर प्रवास केला. याचदरम्यान त्यांनी गोदफ्रे यांची मुलगी जेनिफरसोबतही अनेक नाटकांमध्ये काम केले. नाटकांत एकत्र काम करताना त्यांच्याच प्रेम बहरत गेले आणि वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी वयाने तीन वर्षे मोठ्या असलेल्या जेनिफरशी लग्न केले. कपूर कुटुंबामध्ये अशाप्रकारचे लग्न होण्याची ती पहिलीच वेळ होती.
शाम बेनेगल, अपर्णा सेन, गोविंद निहलानी, गिरीश कर्नाड यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जूनून, कलयुग, ३६ चौरंगी लेन, उत्सव या सिनेमांची निर्मिती केली. हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर फारसे चालले नाहीत. पण समीक्षकांकडून त्यांच्या या सिनेमांना फार प्रशंसा मिळाली होती. हे सिनेमे आजही मैलाचा दगड म्हणून ओळखले जातात.
शशी कपूर हे भारतातले पहिले असे अभिनेते होते ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटिश आणि अमेरिकन सिनेमांमध्ये काम केले होते. हाउस होल्डर, शेक्सपिअरवाला, बॉम्बे टॉकीज आणि हिट अॅण्ड डस्ट सिनेमांचा समावेश आहे.

हिंदी सिनेमांतील त्यांनी दिलेले योगदान पाहून त्यांना २०१५ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
त्यांनी आतापर्यंत ११६ सिनेमांमध्ये काम केले असून त्यातील ६१ सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारली.
‘जुनून’ सिनेमासाठी त्यांना निर्माता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तसेच ‘न्यू दिल्ली टाइम्स’ या सिनेमात उत्कृष्ट अभिनेता आणि ‘मुहाफिज’ या सिनेमासाठी स्पेशल ज्युरीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. २०११ मध्ये भारत सरकारने शशी कपूर यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले होते. शशी कपूर यांना ‘जब जब फूल खिले’ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला होता.

१९८४ मध्ये पत्नी जेनिफर यांचा कर्करोगाने मृत्यू झाल्यानंतर शशी कपूर एकटे राहायला लागले होते. त्यानंतर त्यांची तब्येत सातत्याने बिघडत गेली. सततच्या आजारपणामुळे त्यांनी सिनेसृष्टीपासून दूर राहणेच पसंत केले. १९९८ मध्ये आलेला ‘जिन्ना’ हा त्यांच्या करिअरचा शेवटचा सिनेमा ठरला.
त्यांनी आतापर्यंत ११६ सिनेमांमध्ये काम केले असून त्यातील ६१ सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारली.