बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘टायगर ३’च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. तो परदेशात सध्या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. मनीष शर्मा दिग्दर्शन करत असलेल्या या चित्रपटामध्ये अभिनेत्री कतरिना कैफ सलमानसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे का टायगर सीरिजमधील एका चित्रपटातील भूमिकेची ऑफर ज्येष्ठ नेते शशी थरुर यांना देण्यात आली होती?

‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, २०१८मध्ये शशी थरुर यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की सलमान खानच्या एका चित्रपटामध्ये त्यांना परराष्ट्र मंत्र्याच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. पण शशी थरुर यांनी ती ऑफर नाकारली होती.

आणखी वाचा : “इंटिमेट सीन्स सर्वांसमोर शूट करताना मला…,” जॅकी श्रॉफ यांनी केला खुलासा

‘मला सलमान खानच्या एका चित्रपटात परराष्ट्र मंत्री ही भूमिका ऑफर करण्यात आली होती. पण मला माझ्या एका मित्राने सांगितले की जर तुला परराष्ट्र मंत्री बनायचे असेल तर ती भूमिका साकारु नकोस. मला मित्राने दिलेला सल्ला योग्य वाटला आणि म्हणून मी त्या भूमिकेला नकार दिला’ असे शशी थरुर यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले होते.

तसेच शशी थरुर यांनी सलमान खानच्या ‘अंदाज अपना अपना’ चित्रपटात काम केले असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावर शशी थरुर म्हणाले, ‘मी त्या चित्रटात काम करणे शक्यच नाही. कारण तेव्हा मी अनेक वर्षे संयुक्त राष्ट्रात कार्यरत होतो.’ एकदा सलमान खान आणि शशी थरुर यांची विमानात भेट झाली होती. त्यांनी त्यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर देखील केला होता.

सलमान खानचा ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटात दिसला होता. आता तो लवकरच ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच बिग बॉस १५ हा रिअॅलिटी शो होस्ट करताना दिसणार आहे.