सेन्सॉर बोर्डाकडून चित्रपट प्रमाणित करण्यापूर्वी ‘पद्मावती’चे स्क्रिनिंग केल्याप्रकरणी भाजप खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यावर निशाणा साधला. भन्साळी यांनी राजपूत संघटनांसाठी विशेष स्क्रिनिंगचे आयोजन करणे गरजेचे होते असे म्हणाले. तर या चित्रपटाच्या वादावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांना मौन सोडण्यास सांगितले.

‘पद्मावती’ या चित्रपटाला सुरुवातीपासूनच राजपूत करणी सेनेचा विरोध आहे. करणी सेनेच्याच एका कार्यक्रमात ते बोलत होते. भन्साळी सर्वांत आधी करणी सेनेच्या सदस्यांना चित्रपट दाखवणार होते. हे वचन त्यांनी पाळले नसल्याची टीकाही शत्रुघ्न यांनी केली. ‘पद्मावती’ चित्रपटाच्या वादावर मोदी आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन का गप्प आहेत असा सवाल त्यांनी यापूर्वी ट्विटरच्या माधम्यातून केला होता.

त्याचप्रमाणे त्यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका पदुकोणला मिळत असलेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांचाही निषेध केला. ‘पंतप्रधान मोदी या विषयावर अजून किती दिवस मौन बाळगणार? दिवसेंदिवस हा वाद वाढतच चालला आहे. दिग्दर्शक आणि अभिनेत्रीला उघडपणे जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. अशा धमक्या दिल्या जात असताना देशाचे नेतृत्व करणारे शांत कसे बसू शकतात? गुंडांना जर असेच मोकळे सोडले तर ते मर्यादा ओलांडतील आणि आपण त्यांना नियंत्रित करू शकणार नाही,’ असे ते म्हणाले.

वाचा : ‘आशिकी गर्ल’सोबत हॉरर कॉमेडीत झळकणार राजकुमार

दीपिका पदुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंग यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप राजपूत संघटनांनी केला आहे. चित्रपटाच्या विरोधात देशभरात त्यांच्याकडून निदर्शनेही करण्यात आली. काही भाजप नेत्यांचाही चित्रपटाला विरोध असून हरयाणाच्या एका भाजप नेत्याने भन्साळी आणि दीपिकाचा शिरच्छेद करणाऱ्याला १० कोटींचे बक्षीसही जाहीर केले होते.