६५ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा गुरुवारी पार पडला. या पुरस्कारांपैकी काही पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तर काही पुरस्कार केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. काही विजेत्यांनी या घटनेला पाठिंबा दिला तर काही विजेत्यांनी नाराजी व्यक्त केली. याप्रकरणी बॉलिवूड कलाकार शत्रुघ्न सिन्हा यांनी देखील आपले मत मांडले आहे.

‘राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात जे झाले ते अत्यंत चुकीचे होते. काही तरी गैरसमज झाल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. परंतु जे झालं ते टाळता आलं असतं’, असे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.

‘राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित होणे ही प्रत्येकासाठी अभिमानास्पद गोष्ट असते. मात्र पुरस्कार विजेत्यांपैकी काही निवड व्यक्तींनाच राष्ट्रपती पुरस्कृत करणार असल्याचे ऐकून अन्य विजेत्यांमध्ये नाराजीचे भाव उमटणे स्वाभाविक आहे. खरे पाहता, राष्ट्रपती कोविंद बिहारचे राज्यपाल असल्यापासून मी त्यांना ओळखतो. ते एक व्यक्ती म्हणून चांगले आहेत. त्यामुळे ते कोणालाही जाणूनबुजून दुखावणार नाहीत, असेही सिन्हा यांनी सांगितले.

वाचा : ऐकावे ते नवलच! फेसवॉशही आहे घातक

या पुरस्कारासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील १३१ विजेत्यांची निवड करण्यात आली होती. मात्र या सोहळ्याला केवळ ७८ विजेत्यांनीच उपस्थिती दर्शविल्याचे दिसून आले. राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते काही विजेत्यांना पुरस्कार प्रदान झाला नाही हे मान्य आहे. मात्र केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले हे देखील चुकीचे नाही. त्यादेखील भारतीय जनता पक्षाच्या एक जबाबदार सदस्य आहेत. विशेष म्हणजे शत्रुघ्न सिन्हा यांनी राष्ट्रपती कोविंद यांच्यावर आरोप न करताही या घटनेबाबत नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले.