‘बिग बॉस १३’ची स्पर्धक आणि गायिका शहनाज गिलचे वडील संतोष सिंग सुख यांनी तिच्याशी पुन्हा कधीच न बोलण्याचा निर्धार केला आहे. गेल्या आठवड्यात शहनाज चंदिगडमध्ये असूनसुद्धा घरी आली नाही, अशी तक्रार त्यांनी केलीये. एका म्युझिक व्हिडीओसाठी शहनाज चंदिगडला गेली होती. तिथून तिचं घर अवघ्या दोन तासांच्या अंतरावर होतं. मात्र तिने कुटुंबीयांना भेटण्याचं टाळलं, असं त्यांनी म्हटलं.

शहनाज चंदिगडमध्ये आल्याचं संतोष यांना वृत्तवाहिन्यांद्वारेच समजल्याचं त्यांनी सांगितलं. इतकंच नव्हे तर शहनाजशी संपर्क साधण्यासाठी त्यांच्याकडे तिच्या मॅनेजरचाही फोन नंबर नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

‘टेलिचक्कर’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “शहनाज चंदिगडमध्ये शूटिंगसाठी आली आणि तिथून दोन तासांच्या अंतरावर असलेल्या तिच्या कुटुंबीयांना ती भेटू शकली नाही. ती चंदिगडमध्ये आली होती, हेसुद्धा मला वृत्तवाहिन्यांमधून समजलं. तिच्या आजोबांचं नुकतंच गुडघ्यांचं ऑपरेशन झालंय. किमान त्यांना तरी एकदा भेटण्याची तसदी तिने घेतली नाही.”

“मी शपथ घेतलीये की आता मी तिच्याशी पुन्हा कधीच बोलणार नाही. माझ्याकडे तिच्या मॅनेजरचाही फोन नंबर नाही. माझे काही खूप जवळचे मित्र आहेत. त्यांच्या मुलांना शहनाजसोबत फोटो काढायचा होता. तिच्याकडे याबद्दलची विनंती केली तेव्हासुद्धा माझ्याकडे वेळ नाही असं कारण देत तिने साफ नकार दिला. तिच्याकडे आमच्यासाठी अजिबात वेळ नाही”, असं ते पुढे म्हणाले.

अभिनेता सिद्धार्थ शुक्लासह शहनाज चंदिगडमध्ये एखा व्हिडीओ शूटिंगसाठी गेली होती. ‘बिग बॉस १३’मध्ये सिद्धार्थ आणि शहनाजच्या अफेअरच्या खूप चर्चा रंगल्या होत्या.