धूर आणि धुक्यामुळे देशाची राजधानी दिल्ली सध्या प्रदूषणाची राजधानी झाली आहे. पंजाब, हरयाणा, उत्तर राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांना धुक्याने वेढा घातला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही थंडी सुरू होताच दिल्लीत काळे धुके दाटण्यास सुरुवात झाली असून, हा वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आहे. या प्रदूषणामुळेच आपल्या आईचा जीव गेल्याचे प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांनी म्हटले आहे.

वाचा : ‘लूजिंग माय रिलिजन’च्या ट्विटमुळे रणवीर ट्रोल

शेखर कपूर यांनी ट्विट करून प्रदूषणामुळेच त्यांच्या आई शील कांता कपूर यांचे निधन झाल्याची धक्कादायक बातमी दिली. त्यांनी लिहिलं की, दिल्लीतील प्रदूषणाने माझ्या आईचा जीव घेतला. गेल्यावर्षी हिवाळ्यात माझ्या आईच्या फुप्फुसांना संक्रमण झाले. त्यानंतर त्या कधीच बऱ्या झाल्या नाहीत. आजारामुळे त्यांना नैराश्य आले आणि अखेर त्यांनी प्राण त्यागले. मी त्यांना लंडनला घेऊन येणार होतो. मात्र, त्यांना आमच्या घरीच (दिल्लीतील घर) राहायचे होते.

वाचा : टीव्हीवर लवकरच कपिलचं पुनरागमन पण…

दरम्यान, मंगळवार सकाळपासून दिल्ली आणि उत्तर भारतामधील हवेचा शुद्धता निर्देशांक घसरला. काही भागांतील दृश्यता २०० मीटरपर्यंत घटली. दिल्लीमधील धुरक्याने धोक्याचीही पातळी ओलांडल्यामुळे सरकारला शाळांना सुट्टी द्यावी लागली. दिवसा नागरिक आणि शालेय विद्यार्थी मास्क घालून शहरात फिरत होते. तर, दिल्ली विमानतळावर काम करणाऱ्या औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांना नऊ हजार मास्क पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या १७, १८ व १९ ऑक्टोबरच्या अहवालानुसार दिल्लीतील हवेचा दर्जा भीषण झाला आहे. दिल्लीत मोटारी आणि चार चाकींची संख्या अधिक असल्याने प्रदूषणाचे प्रमाण जास्त आहे, शिवाय कचरा जाळण्याने त्यात भर पडत आहे.