चौकटीबाहेरच्या भूमिका साकारणाऱ्या कंगनाने आपल्या अभिनयाने आजवर अनेक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिचा ‘सिमरन’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिने दिलेल्या मुलाखतींमध्ये घराणेशाहीचा मुद्दा, हृतिकसोबतचं प्रेमप्रकरण, आदित्य पांचोलीच्या खऱ्या रुपाचा केलेला खुलासा यांमुळे ती चांगलीच चर्चेत आली. पण, कंगनाच्या ‘त्या’ मुलाखतीपुढे तिचा चित्रपट फिका पडला अशी उपरोधिक वक्तव्यंही बऱ्याचजणांनी केली आहेत.

कंगनाच्या याच चित्रपटाला निशाणा करत अभिनेता शेखर सुमनने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन नाव न घेता तिच्यावर टीका केली होती. ‘इतका गोंधळ घालण्याचा काही उपयोग झाला का? खोदा पहाड निकली चुहिया….’, असं ट्विट करत त्याने कंगनावर शाब्दिक हल्ला चढवला होता. मात्र या ट्विटनंतर शेखर सुमनलाच ऑनलाइन ट्रोलला सामोरं जावं लागतंय.