टेलिव्हिजन कार्यक्रमादरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि सलमान खानने वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दामुळे वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी विविध ठिकाणी वाल्मिकी समाजाच्या आंदोलनांनंतर शिल्पाने जाहीर माफी मागितली आहे. शुक्रवारी राजस्थानमधील कोतवाली पोलीस ठाण्यात शिल्पा आणि सलमानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला. सलमानच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाविरोधातही जयपूरमध्ये निषेध करण्यात आला होता.

‘मी वापरलेल्या शब्दाचा अर्थ चुकीच्या पद्धतीने घेतला गेला. एखाद्याच्या भावना दुखावण्याच्या उद्देशाने तो शब्द वापरला नव्हता. तरीसुद्धा जरी कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास मी माफी मागते. विविध जाती आणि पंथ असलेल्या देशाची नागरिक असल्याचा मला अभिमान आहे आणि मी त्या सर्वांचा मनापासून आदर करते,’ असे ट्विट शिल्पाने केले.

वाचा : श्रद्धा कपूरला पोलिसांसमोर हजर राहावे लागणार 

‘सुपर डान्सर २’ या रिअॅलिटी शोमध्ये सलमानने त्याच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली होती. या शोमध्ये शिल्पा परीक्षक असून या दोघांवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप वाल्मिकी समाजाने केला. शिल्पा आणि सलमानने वाल्मिकी समाजाची जाहीर माफी मागावी आणि त्यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणीदेखील या समाजाने केली होती.

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. सलमानविरोधात दाखल झालेल्या तक्रारींवरुन आयोगाने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, दिल्लीचे पोलीस आयुक्त आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडून सात दिवसांच्या आत उत्तर मागितले आहे.