अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी अटकेत असलेला व्यावसायिक राज कुंद्राच्या जामीन अर्जाची याचिका न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे दिवसेंदिवस राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ होत असतानाच दुसरीकडे शिल्पा शेट्टीने आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणात चुकीच्या पद्धतीने वार्तांकन करून प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत शिल्पा शेट्टीने उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना अश्लील चित्रपट प्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी राज कुंद्रांच्या अडचणींमध्ये वाढ होऊ लागली आहे. राज कुंद्रांचे वकील सुभाष जाधव यांनी राज कुंद्रांच्या जामिनासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला.

त्यानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीने उच्च न्यायालयात धाव घेत ही याचिका दाखल केली आहे. सोशल मीडिया आणि वेबसाईट्सवर प्रतिमा मलीन करणाऱ्या वार्तांकनावर आळा घालण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीने दाखल केलेल्या या याचिकेसोबतच अनेक उदाहरणेही सादर केली आहेत. अश्लिल चित्रपट निर्मिती प्रकरणात सुरू असलेल्या तपासावर तिने प्रतिक्रिया दिल्याची आणि या प्रकरणात तिचा सहभाग असल्याबाबत चुकीच्या पद्धतीने वार्तांकन करण्यात आल्याची अनेक उदाहरणं तिने सादर केली आहेत. अश्लील चित्रपट प्रकरणात आपले नाव जोडून प्रसारमाध्यांवर त्या संदर्भात बातम्या प्रसारित केल्या जात असल्याने मीडिया हाऊसनी बिनशर्त माफी मागावी आणि २५ कोटी रूपयांची मानहानीची मागणी देखील या याचिकेत करण्यात आली आहे. तसंच बदनामीजनक वृत्तांकन केलेली सर्व माहिती ताबडतोब काढून टाकण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

अश्लील चित्रपट प्रकरणापासून दूर असल्याबाबत दिलेल्या प्रतिक्रियेवर कोणतीही खात्री न करता दिशाभूल करणाऱ्या वार्तांकनामुळे प्रतिमेचं नुकसान झाल्याचा आरोप शिल्पा शेट्टीने या याचिकेमध्ये केलाय. तसंच या प्रकरणात अपराधी असल्याचं दाखवण्यात आलं असून पती राज कुंद्रांवर सुरू असलेल्या खटल्यामुळे पतीला सोडून दिलं असल्याचं देखील चुकीचं वार्तांकन करण्यात आलं असल्याचं तिने म्हटलंय. माध्यमांनी चुकीचे, अपमानजनक, खोटे आणि बदनामीकारक वृत्त प्रकाशित केले आहेत आणि केवळ बदनामीच केली नाही तर आपली प्रतिमा देखील मलीन केल्याचा आरोप तिने या याचिकेत केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे बदनामीकारक लेख आणि व्हिडिओंमुळे तिचे चाहते, अनुयायी, ब्रँड एंडॉर्समेंट कंपन्या, व्यवसायातील सहकारी आणि ज्यांनी आता या बदनामीकारक लेखांवर विश्वास ठेवण्यास सुरुवात केली आहे अशा लोकांच्या मनात तिची प्रतिष्ठा कमी झाली आहे, असं देखील तिने या याचिकेत म्हटलंय. तिच्या विरोधात प्रकाशित होणाऱ्या बदनामीकारक बातम्यांमुळे तिच्या कुटुंबातील सदस्यांची प्रतिमा, तिची अल्पवयीन मुले आणि वृद्ध आई-वडील या सर्वांना द्वेष, उपहास आणि तिरस्कार सहन करावा लागत असून तिचे व्यवसायिक नुकसानही झाले आहे, असं तिने या याचिकेत म्हटलं आहे.