सेटवर जर दिग्दर्शक अनुराग बासू असेल तर सेटवरील सर्व लोकांना थोडं जास्तच सजग राहावं लागतं. कारण ते कधी आणि कोणाची थट्टामस्करी करतील याचा काही नेम नाही. सध्या ते ‘सुपर डान्सर २’ या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक आहेत. त्यांच्यासोबत अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि कोरिओग्राफर गीता कपूरसुद्धा शोमध्ये परीक्षक आहेत. या दोघींची थट्टा करण्याची कोणतीच संधी अनुराग सोडत नाही. नुकतंच त्याने सेटवर शिल्पाची अशी टेर खेचली की तिची बहिण शमिता शेट्टीला याचा धक्का बसला.

शूटिंगदरम्यान ब्रेक असताना अनुरागने हळूच शिल्पाचा फोन घेतला. शिल्पा गरोदर असल्याचा मेसेज त्याने तिच्या फोनवरून शमिताला केला. शिल्पाचा मेसेज पाहून शमिताच्या आनंदाला पारावरच उरला नाही. तिला बरेच मेसेज आणि फोन कॉल्स करून शमिता शुभेच्छा देऊ लागली. शमिता अचानक इतक्या शुभेच्छा का देऊ लागली याचं कारण आधी शिल्पाला समजत नव्हतं. गरोदर नाही हे समजावून सांगायलाही तिला बराच वेळ लागला. थोड्या वेळानंतर हे सर्व अनुरागने केल्याचं तिच्या लक्षात आलं. त्यानंतर अनुराग आणि शिल्पा सेटवर पोट धरून हसू लागले. यापूर्वीही त्याने अनेकदा तिची टेर खेचल्याने शिल्पाला याचा राग आला नाही.

Tiger Zinda Hai: सलमान- कतरिनाचा हा अंदाज तुम्हालाही करणार घायाळ

एकदा शूटिंग करताना अनुरागने शिल्पाच्या माइकची बॅटरीच काढून घेतली होती. हे कोणालाच लक्षात आलं नाही. शूटिंग करताना जेव्हा शिल्पाचा आवाज येणं बंद झालं, तेव्हा काम मध्येच थांबवून माइक तपासला गेला. तेव्हा सर्वांना समजलं की अनुरागने बॅटरी काढून लपवलेली. तेव्हाही सेटवर एकच हशा पिकला.