बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या अडचणी गेल्या काही दिवसांपासून वाढल्या आहेत. शिल्पाचा पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक केल्यापासूनच शिल्पा आणि तिचं कुटुंब विविध अडचणींचा सामना करत आहे. अशातही आता शिल्पाने या अडचणींना सामोरं जात पुन्हा एकदा काम सुरु केलं आहे. शिल्पाने ‘सुपर डान्सर ४’ च्या शूटिंगला पुन्हा एकदा सुरुवात केलीय. पतीच्या अटकेनंतर शिल्पाने पहिल्यांदाच पूर्वीप्रमाणे काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
शिल्पा शेट्टीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आकाशी रंगाच्या साडीतील दोन ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत शिल्पाने एक खास पोस्ट लिहिली आहे. कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, “दृढनिश्चय करणाऱ्या स्त्रीपेक्षा अधिक शक्तिशाली कुणीही नाही.” शिल्पाची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. या पोस्टवर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया देत शिल्पाला पाठिंबा दिला आहे.
View this post on Instagram
शिल्पा शेट्टीच्या या पोस्टवर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने कमेंट केली आहे. “तू सुंदर दिसतेयस आणि तू कायमच प्रेरणा देत आली आहेस” असं जॅकलिन म्हणाली. तर अभिषेक बच्चन आणि सुझेन खानने देखील इमोजी पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत.
राज कुंद्राच्या अटकेपूर्वी शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय होती. ग्लॅमरस फोटो शेअर करत ती चाहत्यंच्या संपर्कात राहायची. मात्र राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने काही दिवस सोशल मीडियापासून ब्रेक घेतला होता. त्यानंतर ‘सुपर डान्सर’ शोची शूटिंग सुरु केल्यानंतर शिल्पाने एक भावूक व्हिडीओ देखील शेअर केला होता.