फिटनेस आणि बोल्ड पर्सनालिटीसाठी अभिनेता मिलिंद सोमण अतिशय लोकप्रिय आहे. काही दिवसांपूर्वीच मिलिंदने ५५वा वाढदिवस साजरा करताना सोशल मीडियावर एक न्यूड फोटो शेअर केला होता. त्यानंतर गोव्यातील वास्को पोलीस स्थानकात मिलिंद विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान मिलिंदची पत्नी अंकिता कोनवारने मिलिंदसोबतच फोटो शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.
अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मिलिंद सोमणचा शर्टलेस फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अंकिताने पांढऱ्या रंगाचा स्विमिंगसूट परिधान केला आहे. हा फोटो शेअर करत अंकिताने ‘मला नेहमीच अभिमान आहे’ या आशयाचे कॅप्शन तिने दिले आहे. या पोस्टद्वारे अंकिताने पतीला पाठिंबा दिला असल्याचे म्हटले जात आहे.
गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर अश्लिल व्हिडीओ चित्रीत केल्याप्रकरणी पूनम पांडेला अटक करण्यात आली होती. दरम्यान, ही घटना ताजी असतानाच गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर न्यूड फोटोशूट केल्याप्रकरणी मॉडेल, अभिनेता आणि फिटनेस प्रमोटर मिलिंद सोमणविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आयटी कायद्याच्या आयपीसीच्या कलम २९४ आणि सेक्शन ६७ अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिलिंद सोमणचा हा फोटो समोर आल्यानंतर गोव्यातील राजकीय पक्ष गोवा सुरक्षा मंचानं वास्को पोलीस स्थानकात ही तक्रार दाखल केली.