दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘फर्जंद’ला मुंबईमध्ये प्राईम शो न मिळाल्यामुळे सिनेमाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांच्याकडे धाव घेतली. ‘वीरे दी वेडिंग’, ‘परमाणु’, ‘भावेश जोशी’ या हिंदी सिनेमांना अधिकाधिक प्राईम शो दिले गेल्यामुळेच ‘फर्जंद’ सिनेमाच्या टीमला प्राईम शो नाकारण्यात आला. परळ- लालबागसारख्या मराठमोळ्या पट्ट्यामध्येही चित्रपटगृहात सिनेमाला प्राईम शो दिले गेले नाही. शेवटी या प्रकरणात अमेय खोपकर यांनी चित्रपट मालकांना इशारा देत म्हटले की, ‘जर फर्जंद सिनेमाला प्राईम शो दिले गेले नाही तर मनसे स्टाईल खळ्ळखट्याकला सामोरं जाण्यास तयार रहा.’

एकीकडे मुंबईत ‘फर्जंद’ सिनेमावर अन्याय होत असला तरी महाराष्ट्रभर सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पुण्यात या सिनेमाचे अनेक शो हाउसफुल्ल होत आहेत. मुंबईत ‘फर्जंद’वर होणाऱ्या अन्यायाबद्दल बोलताना सिनेमाचा दिग्दर्शक दिग्पाल म्हणाला की, ‘ज्या दिवशी आम्हाला स्लॉट कळला, त्या दिवसापासून आम्ही वितरकांच्या आणि प्रदर्शकांच्या संपर्कात होतो. काही ठिकाणी तरी प्राईम शो मिळावे याची आम्ही प्रदर्शकांकडे सातत्याने मागणी करत होतो. सुरूवातीला सिनेमाला मिळणाऱ्या प्रतिसादावर प्राईम शो द्यायचा की नाही हे ठरवू असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. पण सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळूनही प्राईम शो देण्यास ते तयार होईना. शेवटी आम्हाला मनसे चित्रपट सेनेचे मदत घ्यावी लागली. अमेय खोपकर यांनी आम्हाला सिनेमाच्या प्राईम शोसाठी हवी असलेली सर्व मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.’

फर्जंद सिनेमाचे निर्माते अनिरबान सरकार म्हणाले की, ‘आतापर्यंत या सिनेमावर ७ ते ८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. एक चांगली कलाकृती प्रेक्षकांसमोर मांडण्यासाठी फर्जंदच्या संपूर्ण टीमने फार मेहनत घेतली. पण ही मेहनत योग्य स्लॉट न मिळाल्यामुळे वाया जाणार असेल तर ते योग्य नाही. मुंबईत फर्जंदला सगळे दुपारचे शो देण्यात आले. कामावर जाणाऱ्यांना असे शो पाहणे शक्यच होत नाही. त्यातही शनिवार आणि रविवारी सिनेमाला अधिक शो दिले गेले नाहीत. तेव्हाही दुपारचेच शो होते. त्यामुळे सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर त्याचा परिणाम झाला.’ फर्जंद सिनेमाच्या प्राईम शोच्या वादामुळे मुंबईत मराठी सिनेमांबवर प्रदर्शनावेळी होणारा भेदभाव पुन्हा एकदा समोर आला आहे.