छत्रपती शिवाजी महाराजांवर आतापर्यंत अनेक मराठी चित्रपट येऊन गेले आहेत. त्यानंतर अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी-अभिनेत्री जेनेलिया देशमुख शिवाजी महाराजांवरील मराठी चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे जवळपास दोन वर्षांपूर्वीच समोर आले होते. मराठीतील आघाडीचा दिग्दर्शक रवी जाधव या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याचेही वृत्त होते. तेव्हापासून सर्वजण या चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहेत. पण, अद्याप या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झालेली नाही.

वाचा : प्रिया बापटच्या आयुष्यात खास व्यक्तीचे आगमन

‘लय भारी’द्वारे मराठी चित्रपटांच्या रुपेरी पडद्यावर अवतरलेल्या रितेशने ‘बालक पालक’द्वारे चित्रपट निर्मितीत प्रवेश केला. नुकताच त्याची निर्मिती असलेला ‘फास्टर फेणे’ चित्रपट प्रदर्शित झाला असून, बॉक्स ऑफिसवर त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. दरम्यान, एका मुलाखतीवेळी छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटाविषयीची माहिती रितेशने दिली. तो म्हणाला की, नुकतंच आम्ही चित्रपटाचा पहिला ड्राफ्ट पूर्ण केला असून, त्याचा सराव सुरु आहे. पुढच्या वर्षी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल. सध्या तरी मराठीतच हा चित्रपट आणण्याचा विचार आहे. मात्र, पुढे जाऊन कदाचित आम्ही हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करू शकतो. त्यावर नंतर विचार करण्यात येईल.

वाचा : गंभीर दुखापतीमुळे मराठमोळ्या अभिनेत्याची प्लास्टिक सर्जरी

रितेशच्या निर्मिती कंपनीअंतर्गत प्रदर्शित होणारा हा पाचवा चित्रपट असेल. त्याच्या निर्मितीअंतर्गत प्रदर्शित झालेल्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याबद्दल रितेश म्हणाला की, आम्ही निर्मिती केलेल्या प्रत्येक चित्रपटाचा जॉनर वेगळा होता आणि त्यांना प्रेक्षकांची पसंतीही मिळाली याचे मला समाधान वाटते. जेव्हा तुम्ही कमी बजेटचे चित्रपट करता तेव्हा तुम्हाला त्याच्या कथेवर अधिकाधिक काम करून तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या गोष्टींमध्येच उत्कृष्ट कलाकृती सादर करावी लागते.

एकंदरीतच शिवाजी महाराजांवरील या चित्रपटाची उत्सुकता असलेल्या प्रेक्षकांना अजून वर्षभर तरी वाट पाहावी लागणार आहे.