बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्या आयुष्यावर साकारल्या जाणाऱ्या चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिका साकारत आहे. यासाठी ती गेल्या काही दिवसांपासून सायनाचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्याकडे प्रशिक्षणही घेत आहे. मात्र, आता एका वेगळ्याच कारणामुळे या चित्रपटाच्या वाटेत अडथळा आला आहे. या अडथळ्यांमुळे चित्रीकरणाच्या वेळापत्रकाला विलंब होत असल्याने श्रद्धाच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीची निवड होणार असल्याची चर्चा आहे. किंबहुना चित्रपटाच्या निर्मात्यांमी श्रद्धाच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीची निवड करण्याचा वचार केल्याची माहिती ‘डेक्कन क्रॉनिकल’ने दिली आहे.

२०१७ हे वर्ष ‘आशिकी’ गर्ल श्रद्धासाठी फार काही खास ठरलं नाही. त्यातच आता २०१८ची सुरुवातही तिच्यासाठी विशेष नाही असंच चित्र दिसून येत आहे. गेल्या वर्षी तिचे ‘हसीना पारकर’ आणि ‘ओके जानू’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफीसवर आपटले. आता आगामी सायना नेहवालच्या बायोपिकमधूनही तिची एक्झिट होणार असल्याचं म्हटलं जात आहे. सायनाच्या भूमिकेसाठी श्रद्धा प्रशिक्षणासाठी इतका वेळ घेत आहे की, फेब्रुवारीमध्ये सुरु होणारं शूटिंगदेखील पुढे ढकलावं लागत आहे. ही सर्व परिस्थिती पाहता निर्मात्यांना श्रद्धाच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीचा विचार करावा लागतोय.

वाचा : ‘टायगर जिंदा है’ची ३०० कोटींची झेप!

श्रद्धाच्या जागी अभिनेत्री दीपिका पदुकोणला सायनाच्या भुमिकेसाठी घेण्याचा निर्मात्यांचा विचार सुरु आहे. दीपिकाला बॅडमिंटनची पार्श्वभूमी असल्याने तिच्यासाठी ही भूमिका साकारणं सोपं जाणार असल्याचं निर्मात्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता या बायोपिकमधून श्रद्धा आऊट होऊन दीपिका इन होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.