‘मोहम्मद अली रोड का लफडा सुलझाने के लिए तुम्हे दुबई से कॉल आएगा…’ श्रद्धा कपूरच्या या दमदार आणि खोल आवाजाने ‘हसीना पारकर’ या चित्रपटाच्या ट्रेलरला सुरुवात होते. अपूर्व लाखिया दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर श्रद्धाने ट्विटर अकाऊंटवर शेअर केलाय. आतापर्यंत सिनेमाचे अनेक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहेत. यात दाऊद इब्राहिम, हसीना पारकर यांची झलक दाखवण्यात आली होती. या ट्रेलरमधून मुख्य भूमिका साकारत असलेल्या श्रद्धाचा दमदार अभिनय पाहायला मिळतोय.
या चित्रपटात श्रद्धा पहिल्यांदाच कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या बहिणीची भूमिका साकारत असून तिचा वेगळात अंदाज दिसून येतोय. ‘आपने मेरे भाई के बारे मे पढा है…मैंने मेरे भाई को पढा है’ असे म्हणताना श्रद्धा कपूर हसीना पारकरच्या भूमिकेत पार उतरल्याचे स्पष्ट दिसून येते. बॉम्बस्फोटाचे दृश्य, श्रद्धाचा आक्रोश, दाऊदच्या बहिणीपासून ‘आपा’पर्यंतचा हसीना पारकरचा प्रवास या ट्रेलरमधून दाखवण्यात आलाय.
Very excited and nervous to share the trailer of #HaseenaParkar Hope you all like it https://t.co/CjNk7AGWx5
— Shraddha (@ShraddhaKapoor) July 18, 2017
वाचा : चार मुलांची आई बनली श्रदधा कपूर!
एका बहिणीपासून सुरु झालेल्या हसीनाचा प्रवास ‘गॉडमदर’ आणि ‘गँगस्टर’पर्यंत येऊन कसा थांबला याचं प्रभावी चित्रण ‘हसीना…’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपटातून गुन्हेगारी विश्व, गँगवॉर आणि एका वेगळ्या मुंबईची झलक पाहायला मिळणार आहे. चित्रपटाची निर्मिती नाहिद खान करत असून, या चित्रपटातून दाऊद इब्राहिमच्या भूमिकेत खुद्द श्रद्धाचा भाऊ सिद्धार्थ कपूर झळकणार आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपटाची उत्सुकता नक्कीच निर्माण होते. १८ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.