श्रद्धा कपूर, राजकुमार राव, अपारशक्ती खुराणा, अभिषेक बॅनर्जी, पंकज त्रिपाठी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘स्त्री’ चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. भयपट आणि विनोदी चित्रपट अशा दोन्ही प्रकाराची गुंफण असलेल्या ‘स्त्री’ चित्रपटाला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद लाभला. आता या चित्रपटाचा सिक्वलही लवकरच येणार आहे.
चित्रपटाची कथा ही ‘स्त्री’ या भूताभोवती फिरते. मध्य प्रदेशमधल्या चंदेरी गावात पूजेच्या चार दिवसांत ‘स्त्री’ नावाचे भूत येते आणि घरातील पुरुषांना गायब करते. फक्त त्यांचे कपडे तेवढे घरच्यांसाठी मागे सोडते. त्यामुळे ‘स्त्री’चं संकट परतवण्यासाठी गावातील प्रत्येक घराच्या भिंतीवर ‘ओ स्त्री कल आना’ असं लिहिल जातं. या गावाला ‘स्त्री’पासून वाचवणाऱ्या राजकुमार , अपारशक्ती , अभिषेक, पंकज , श्रद्धा यांची धम्माल या चित्रपटात पाहायला मिळाली आहे.
सुरूवातीपासून श्रद्धा कपूरच या चित्रपटातील ‘स्त्री’ म्हणजेच भूत आहे असं वाटते, नंतर मात्र कथानक वेगळ्याच वळणार येतं आणि प्रेक्षकांचा संभ्रम दूर होतो. मात्र ‘स्त्री’चा शेवट जाता जाता प्रेक्षकांना पुन्हा गोंधळात पाडतो. त्यामुळे चंदेरी गावातील ‘स्त्री’ कोण याचाच संभ्रम सिक्वलमध्ये दूर होणार आहे.
सिक्वलचा विचार करूनच चित्रपटाची कथा तयार करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील भागात ‘स्त्री’च्या कथेचा उलगडा होणार आहे अशी माहिती मॅडॉक फिल्मनं दिली आहे. लवकरच सिक्वलच्या चित्रिकरणाला सुरूवात होणार आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत १७. ६९ कोटींची कमाई केली आहे.