सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित सिनेमा येणार असल्याची माहिती याआधीच सर्वांना कळली होती. सिनेमात सायनाची भूमिका श्रद्धा कपूर साकारणार आहे. सध्या श्रद्धा सायनाच्या आत्मचरित्रपटात काम करण्यासाठी घाम गाळताना दिसत आहे. श्रद्धाने नुकताच सायनासोबतचा बॅडमिंटनचा सराव करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. खेळताना सायनाची देहबोली कशी असते याचे बारकावे सध्या ती शिकत आहे. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये सायना तिला काही महत्त्वाच्या टिप्स देत असल्याचे दिसते.

बॉबी डार्लिंगची सासू म्हणते माझी सून पहिलवान

सुरुवातीला या सिनेमात दीपिका पदुकोणची वर्णी लागणार असे म्हटले जात होते. पण नंतर दीपिकाला डावलून श्रद्धाच्या नावाला पसंती देण्यात आली. दीपिकाचे नाव जरी या सिनेमातून वगळण्यात आले तरी अजूनही तिचे कनेक्शन या सिनेमाशी असल्याचे दिसून येते.

https://www.instagram.com/p/BYxftYpFmNZ/

या सिनेमासाठी श्रद्धा फक्त सायनाकडूनच प्रशिक्षण घेतेय असे नाही तर ती दीपिका पदुकोणचे वडील प्रकाश पदुकोण यांच्याकडूनही बॅडमिंटनचे धडे गिरवत आहे. मुंबई मिररने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, श्रद्धा नियमित त्यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यास जाते. सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली नसली तरी श्रद्धाचे प्रशिक्षण मात्र सुरू झाले आहे. श्रद्धाच्या करिअरसाठी हा फार महत्त्वाचा सिनेमा मानण्यात येतो.

कोणत्याही खेळाडूच्या आत्मचरित्रपटात काम करताना त्यासाठी इतर सिनेमांपेक्षा अधिक मेहनत घ्यावी लागते. आता सायनाची व्यक्तिरेखा मोठ्या पडद्यावर साकारायची म्हणजे तिला बॅडमिंटनच्या कोर्टवर घाम तर गाळावा लागणारच ना… अमोल गुप्ते दिग्दर्शित या सिनेमाचे नाव अजून ठरले नसून पुढच्या वर्षी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचे अधिकतर चित्रीकरण मुंबई आणि हैदराबादमध्ये होणार आहे.

पुढचे वर्ष श्रद्धासाठी फार महत्त्वपूर्ण असेल यात काही शंका नाही. एकीकडे सायना नेहवालचा हा बायोपिक येणार तर दुसरीकडे श्रद्धाचा सुपरस्टार प्रभाससोबतचा ‘साहो’ हा दाक्षिणात्य सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.