आपल्या सुरेल आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारी प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालचा आज वाढदिवस. १२ मार्च, १९८४ रोजी दुर्गापूर इथल्या बंगाली कुटुंबात जन्मलेल्या श्रेयाने ‘सारेगमप’ या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. ही स्पर्धा जिंकल्यानंतर श्रेयाची कारकीर्द सुरू झाली. तिने मराठी, कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू, बंगाली, आसामी इत्यादी प्रादेशिक भाषांमधूनही पार्श्वगायन केले आहे. श्रेयाच्या आवाजाचे चाहते अनेक आहेत. एका देशात चक्क ‘श्रेया घोषाल दिन’ साजरा केला जातो. हा देश कोणता आणि श्रेयाला हा सन्मान कसा मिळाला ते जाणून घेऊयात..
अमेरिकेतल्या ओहिओ राज्यात २६ जून हा दिवस ‘श्रेया घोषाल डे’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तिची गाणी तिथे ऐकली जातात. २०१० मध्ये ओडियोचे तत्कालीन राज्यपाल टेड स्ट्रीकलँड यांनी श्रेयाला हा सन्मान दिला.
निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी त्यांच्या ‘देवदास’ चित्रपटातून श्रेयाला सर्वप्रथम संधी दिली. या चित्रपटातील गायनासाठी तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वात्कृष्ट पार्श्वगायिकेसाठीचा फिल्मफेअर पुरस्कार तसेच फिल्मफेअर आर.डी. बर्मन पुरस्कार मिळाले. तेव्हापासून तिने सुमारे २०० चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. ज्यासाठी तिला एकूण ४ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, ५ फिल्मफेअर पुरस्कार व ७ दक्षिणेमधील फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.