बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची आज जयंती. श्रीदेवी यांच्या आकस्मिक निधनामुळे बॉलिवूडसह देशभरातील चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. सौंदर्य, अभिनय आणि नृत्याविष्काराने श्रीदेवी यांनी प्रेक्षकांची मनं जिकली होती. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी श्रीदेवी यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं होतं.
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी श्रीदेवी यांनी तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमधील अनेक सिनेमांमध्ये काम केलं होतं. श्रीदेवी यांना पहिला महिला सुपरस्टार म्हणून ओळखलं जातं. श्रीदेवी यांचे बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमे प्रचंड गाजले यापैकीच एक म्हणजे चालबाज. चालबाज’ हा सिनेमा हेमा मालिनी यांच्या सीता और गीता सिनेमाचा रिमेक होता.मात्र हा सिनेमा रिमेक असल्याचं श्रीदेवी यांनी प्रेक्षकांना विसरायला लावलं. या सिनेमातील ‘ना जाने कहां से आई है ये लड़की’ हे गाणं चागंलच गाजलं होतं. मात्र अनेकांना ठाऊक नसेल की श्रीदेवी यांनी कोणत्या परिस्थितीमध्ये हे गाणं शूट केलं आहे.
या संपूर्ण गाण्यात पाऊस कोसळताना दिसत आहे. गाण्याच्या शूटिंगवेळी श्रीदेवी यांना १०३ डिग्री ताप होता. तापाने फणफणलेल्या असताना देखील श्रीदेवी यांनी आराम करण्याएवजी या गाण्याचं शूटिंग पूर्ण केलं. या गाण्यात श्रीदेवी यांना पावसात भिजत शूटिंग करायचं होतं. मात्र तरीही त्यांनी नकार दिला नाही. यावरून श्रीदेवी यांचं कामाप्रति असलेलं प्रेम आणि आत्मियता दिसून येते.
‘चालबाज’ सिनेमासोबतच त्याकाळात हे गाणं देखील चांगलच लोकप्रिय ठरलं होतं. या सिनेमासाठी श्रीदेवी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला होता.