सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर, मराठी चित्रपटसृष्टीतील अनेकांच्याच आवडीचे हे दोन कलाकार. सतत चेहऱ्यावर स्मित असणाऱ्या या कलाकार जोडप्याची चित्रपट वर्तुळात नेमीच चर्चा असते. कलाकारांची मुलं चित्रपटसृष्टीत पदार्पण करतात तेव्हा त्यांच्याकडून प्रेक्षकांच्या बऱ्याच अपेक्षा असतात. त्यातच जर सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी म्हटल्यावर प्रेक्षकांना नक्कीच खूप अपेक्षा होत्या. चित्रपटसृष्टीत स्वत:ची ओळख बनवण्याचा प्रयत्न श्रिया पिळगावकरने केला. यामध्ये काही प्रमाणात ती यशस्वीही झाली.
वडिलांच्या अभिनयाच्या कलेसोबतच श्रिया दिग्दर्शनाचा वारसाही यशस्वीपणे पुढे नेताना दिसतेय. नुकतंच श्रियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये श्रिया सचिन पिळगावकर यांच्यासोबत कॅमेरा हाताळताना दिसतेय. सचिन पिळगावकर यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे आणि श्रियानेही एका कार्यक्रमासाठी सहाय्यक दिग्दर्शन केल्याचे कळते.
https://www.instagram.com/p/BVegQnfnuIp/
श्रियाने आपल्या वडिलांची, सचिन पिळगावकर यांची निर्मिती असलेल्या ‘एकुलती एक’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर झळकण्याची प्रत्येक लहान-मोठ्या कलाकाराची इच्छा असते. त्यातही बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांसोबत काम करायला मिळणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. श्रियालाही अशीच एक संधी मिळाली. हिंदी चित्रपसृष्टीत पदार्पण करत तिने थेट किंग खानसोबत स्क्रीन शेअर केली होती. ‘फॅन’ या चित्रपटात श्रियाने शाहरूख खानसोबत भूमिका साकारली होती.
वाचा : बी-टाऊनमधील बेस्ट फ्रेंड्सची ही नवी जोडी पाहिली का ?
श्रियाच्या चाहत्यांचा वर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत करिअरची योग्य दिशा निवडून आपणही एका मुलापेक्षा कमी नसल्याचे सिद्ध केले आहे. सचिन पिळगावकरांचा हा वारसा पुढे नेण्यात श्रिया यशस्वी ठरतेय असं म्हणायला हरकत नाही.