अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. महाराष्ट्र सरकार आणि बॉलिवूड सिनेसृष्टीवर ती सातत्याने आरोप करत आहे. अलिकडेच तिने बॉलिवूडमधील ९९ टक्के कलाकार अंमली पदार्थांचं सेवन करतात असा खळबळजनक आरोप केला होता. तिच्या या आरोपाला अभिनेत्री श्वेता त्रिपाठी हिने प्रत्युत्तर दिलं आहे. बॉलिवूडमध्ये कोणी तुम्हाला ड्रग्स भरवत नाही, असं म्हणत तिने कंगनावर निशाणा साधला आहे.

श्वेता सध्या ‘कार्गो’ या वेब सीरिजमुळे प्रचंड चर्चेत आहे. या सीरिजच्या निमित्ताने आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत तिने कंगनाच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, “सध्या काही लोक बॉलिवूडवर खोटे आरोप करत आहेत. ९९ टक्के कलाकार ड्रग्स घेतात, अभिनेत्रींना काम मिळवण्यासाठी निर्मात्यांसोबत झोपावं लागतं, असे आरोप केले जात आहेत. मात्र या केवळ अफवा आहेत. मी देखील इतर कलाकारांप्रमाणे मुंबईत आले होते. मी देखील काम मिळवण्यासाठी स्ट्रगल केलं. अनेक ठिकाणी रिजेक्शन मिळाली पण कोणीही माझा लैंगिक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला नाही. अनेक प्रकारच्या सेलिब्रेशन पार्ट्यांमध्ये मी जाते. तिथे अनेक नामांकित कलाकार येतात. पण मी तरी कोणाला ड्रग्स घेताना पाहिलं नाही. जर ९९ टक्के लोक रोज ड्रग्स घेऊन नशेत राहिले असते तर इतके सुंदर चित्रपट बॉलिवूडमध्ये कधी तयारच झाले नसते. बॉलिवूडमध्ये कोणी जबरदस्तीने ड्रग्स भरवत नाही. ड्रग्सबद्दल बोलायचं झालं तर मुंबईतच नाही तर संपूर्ण देशात ड्रग्स घेतलं जातं. त्यामुळे उगाचच केवळ आरोप करण्यासाठी काहीही बोलणं चुकीचं आहे.”

यापूर्वी काय म्हणाली होती कंगना?

‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत कंगना रणौतने उर्मिला मातोंडकर यांना सॉफ्ट पॉर्न करणारी अभिनेत्री असं म्हटलं होतं. “उर्मिला मातोंडकर या सॉफ्ट पॉर्न स्टार आहेत. त्या त्यांच्या अभिनयासाठी नक्कीच ओळखल्या जात नाहीत. कशामुळे ओळखल्या जातात मग? सॉफ्ट पॉर्नसाठीच ना? जर त्यांना तिकिट मिळू शकतं तर मला का नाही मिळणार? कोणालाही तिकिट मिळू शकतं.” अशी टीका तिने केली होती. या टीकेमुळे बॉलिवूड विरुद्ध कंगना असा सुरु असलेला वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.