‘बिग बॉस’चे ११वे पर्व केवळ त्यातील स्पर्धकांमुळेच नाही तर त्यात विशेष उपस्थिती लावणाऱ्या पाहुण्यांमुळेही गाजले. काही दिवसांपूर्वीच ‘बिग बॉस’चे ११ पर्व संपले. शोच्या अंतिम सोहळ्यात ‘अय्यारी’ फेम अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि मनोज बाजपेयी यांनीही उपस्थिती लावली होती. मात्र, शोदरम्यानच्या एका वक्तव्यामुळे सिद्धार्थला भोजपुरी चित्रपटांची निर्माती आणि अभिनेत्री नीतू चंद्राकडून खडेबोल ऐकावे लागले. त्यावर सिद्धार्थने त्याच्या वक्तव्यासाठी नुकतीच माफीही मागितली.

वाचा : शाहरुख खान चौथ्या अपत्याचे नाव ठेवणार आकांक्षा

‘बिग बॉस’मध्ये सिद्धार्थला सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ चित्रपटातील काही संवाद भोजपुरी भाषेत बोलण्याचे टास्क देण्यात आले होते. हे संवाद म्हणत असतानाच त्याने, ‘भोजपुरी बोलताना मला स्वच्छतागृहात असल्यासारखे वाटते’, असे म्हटले. ही गोष्ट नीतूला काही रुचली नाही. तिने सिद्धार्थला खडसावणारे ट्विट करत लिहिलं की, ‘ज्याला नेहमी सर्वोत्कृष्ट कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली, त्याने असे वक्तव्य करणे निराशाजनक आहे. ज्याने स्वत:च्या बळावर चित्रपटसृष्टीत नाम कमावले, अशा व्यक्तीने राष्ट्रीय वाहिनीवर भोजपुरी भाषेबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणे धक्कादायक आहे. एखाद्या भाषेबद्दल असे बोलताना तुला लाज वाटली पाहिजे’

वाचा : ‘पद्मावत’मधील हे चार दमदार संवाद व्हायरल

यावर सिद्धार्थने ट्विट केलं की, एका टीव्ही शोमध्ये गेलो असता मी नवीन भाषा बोलण्याचा प्रयत्न केला. त्यादरम्यान मी कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर मी त्यासाठी माफी मागतो. कोणाचाही अनादर करण्याचा माझा हेतू नव्हता. सिद्धार्थच्या या ट्विटनंतर कदाचित नीतूचा राग शांत झाला असेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.