अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने नुकत्याच एका चरित्रपटाला होकार दिला असून तो कारगिल युद्धात देशासाठी शहीद होणाऱ्या विक्रम बत्रा यांची भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वी या चरित्रपटातील मुख्य भुमिकेसाठी सिद्धार्थच्या नावाची चर्चा होती. मात्र, आता त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

‘त्यांच्या आयुष्याबद्दल बऱ्याच गोष्टी आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. मला चित्रपटासाठी घोडेस्वारीसारख्या काही गोष्टींचे प्रशिक्षणही घ्यावे लागणार आहे,’ असे म्हणत पुढच्या वर्षी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याचे सिद्धार्थने सांगितले. त्याचप्रमाणे प्रेरणादायी कथा नेहमीच आवडत असल्याचेही त्याने म्हटले. पहिल्यांदाच एका रिअल लाइफ हिरोच्या आयुष्यावर काम करण्याची संधी मिळाल्यामुळे सिद्धार्थ खूप उत्सुक आहे. मुख्य म्हणजे निर्माता, दिग्दर्शक किंवा लेखकाने चित्रपटासाठी सिद्धार्थची निवड केलेली नाही. तर, विक्रम यांच्या कुटुंबीयांना सिद्धार्थनेच ही भूमिका साकारावी असे वाटते.

सूत्रांच्या माहितीनुसार, विक्रम बत्रा आणि त्यांचा जुळा भाऊ विशाल बत्रा अशी दुहेरी भूमिका तो साकारणार आहे. सध्या चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरू असून इतर भूमिकादेखील अद्याप निश्चित झाल्या नाहीत.

वाचा : कपिल शर्मा लवकरच विवाहबंधनात अडकणार?

विक्रम बत्रा यांच्यावर आधारित असलेला हा काही पहिला चित्रपट नसेल. याआधी २००३ साली आलेल्या ‘एलओसी कारगिल’ चित्रपटाची कथाही त्यांच्याभोवती फिरणारी होती.

Story img Loader