अभिनेता आणि बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्लाचं गुरुवारी निधन झाले. 40 वर्षीय सिद्धार्थने मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाने मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसलाय. सिद्धार्थचा मृतदेह मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याने रात्री झोपण्यापूर्वी काही औषधे घेतली होती. पण त्यानंतर तो उठू शकला नाही. त्याने कोणते औषध घेतले होते हे स्पष्ट झालेले नाही. सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या वृत्ताला रुग्णालयाने दुजोरा दिला.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ शुक्लाला बुधवारी रात्री पासून छातीत दुखू लागल्याची तक्रार सुरू होती. रात्री 3-4 वाजता त्याला पुन्हा थोडं अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे तो उठला आणि आईकडे थंड पाणी मागितलं. पाणी पिऊन तो पुन्हा झोपला. सकाळी उठल्यानंतर त्याच्या छातीत दुखणं सुरूच होतं. पुन्हा त्याने पाणी प्यायलं आणि पाणी पिताना अचानक बेशुद्ध पडला. सिद्धार्थला अशा अवस्थेत पाहून त्याच्या आईने आणि बहिणीने ताबडतोब त्याला कूपर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. रुग्णालयात नेताना त्याच्या शरीरात कोणतीही हालचाल होत नव्हती.

आणखी वाचा : सिद्धार्थच्या निधनाने बॉलिवूड हादरलं; मनोज वाजपेयी, रविना टंडन, कपील शर्माची पहिली प्रतिक्रिया

कूपर रुग्णालयात आणण्यापूर्वीच सकाळी साधारण 9.25 वाजता त्याचा मृत्यू झाला होता. कूपर रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार कोणतीही बाह्य जखम आढळून आलेली नाही. सिद्धार्थचा मृतदेह कूपर रूग्णालयात ठेवण्यात आलं असून थोड्याच वेळात शवविच्छेदन करण्यात येणार आहे. सध्या कूपर रूग्णालयात त्याची आई आणि बहिण उपस्थित आहे.