‘फॅशन’, ‘क्वीन’, ‘तनू वेड्स मनू’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय कौशल्य सादर करत प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री कंगना रणौत गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. चित्रपटसृष्टीतील घराणेशाहीविरुद्ध आवाज उठवणाऱ्या कंगनाने नेहमीच आपली परखड मतं मांडली. ‘एनडीटीव्ही युथ फॉर चेंज’ या कार्यक्रमात तिने पुरस्कार सोहळे, आगामी ‘सिमरन’ चित्रपटाच्या लेखकाने तिच्यावर केलेले आरोप या विषयांवर ती व्यक्त झाली.

‘सिमरन’ चित्रपटाची लेखक अपूर्व आसरानीने कंगनावर दिग्दर्शनाचं श्रेय लाटल्याचा आरोप केला होता. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये कंगनाचं नाव सहलेखिका म्हणून नमूद करण्यात आलं होतं. याला विरोध दर्शवत कंगनाने जे काम केलंच नाही त्याचं श्रेय लाटत असल्याचा आरोप त्याने फेसबुकवर केला. यावर स्पष्टीकरण देत कंगना म्हणाली, ‘या चित्रपटात मी दिग्दर्शनाचं कोणतंच काम केलं नाही. जर मी ते केलं असतं तर अभिमानाने ती गोष्ट सांगितली असती.’

कंगना मुळची हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्यातील आहे. तिच्या कुटुंबियांचा चित्रपटसृष्टीशी दूरदूरपर्यंत काहीच संबंध नव्हता. ‘मोठ्या शहरे आर्थिक गोष्टींवर जास्त लक्ष देणारी असतात. तर छोट्या गावांमध्ये मावशी, आत्या, इतर लोक काय म्हणतील याचाच जास्त विचार केला जातो. अशा वातावरणात मी लहानपणापासून राहिले. त्या विचारसरणीमध्ये माझी घुसमट व्हायची आणि मला त्यातून मुक्त व्हायचे होते,’ असे ती म्हणते.

दमदार अभिनयामुळे कंगनाचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. मात्र कंगना पुरस्कार सोहळ्यांपासून नेहमीच लांब राहिली. याबद्दल ती म्हणाली की, ‘आपल्या पुरस्कार सोहळ्यांमुळे अनेक फेरफार केले जातात. उदाहरणार्थ, सोहळ्यात परफॉर्म करण्यासाठी आधीच कोणता पुरस्कार मिळणार हे तुम्हाला सांगितले जाते. यामुळे मी अशा सोहळ्यांपासून दूरच राहणे पसंत करते. ‘

‘चित्रपटांमधील तुमचे महत्त्व अधोरेखित करता येण्यासारखे काम करायला मला आवडते. माझ्या ३० वर्षांच्या आयुष्यात मी आतापर्यंत खूप काही पाहिले आहे. एक चित्रपट तुमच्या आयुष्याची जवळपास दोन वर्ष घेतो. अशा प्रकारचे योगदान मला चित्रपटांमध्ये द्यायचे आहे. मनोरंजनाचा भाग बाजूला ठेवला तर तुमचे महत्त्व अधोरेखित करता येणार नाही असे कोणतेही काम मला करायचे नाही,’ असे कंगना ठामपणे सांगते. तिचा आगामी ‘सिमरन’ चित्रपट १५ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यामध्ये पुन्हा एकदा ती स्त्रीप्रधान भूमिका साकारताना दिसणार आहे.