लोकप्रिय आसामी गायिका आणि अभिनेत्री बिदिशा बेजबरुआ हिने गुडगाव येथील राहत्या घरी आत्महत्या केली आणि संपूर्ण कलाविश्वालाच धक्का बसला. याप्रकरणी बिदिशाच्या पतीला अटक करण्यात आली. मात्र याहून धक्कादायक बाब घडली अशी की सर्वप्रथम ही बातमी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या घाईगडबडीत ‘आज तक’च्या वेबपोर्टलकडून मोठी चूक झाली. बिदिशाच्या आत्महत्येची बातमी ‘आज तक’ने सुप्रसिद्ध गायिका मोनाली ठाकूर हिच्या फोटोसह प्रसिद्ध केली. ही घोडचूक राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका मोनालीने स्वत: त्यांच्या लक्षात आणून दिली.

या गंभीर चुकीबाबत ट्विट करत मोनालीने ‘आज तक’वर राग व्यक्त केला. ‘या बेजबाबदारपणाबद्दल तुम्हाला काय म्हणायचे आहे? याचे कारण मला जाणून घ्यायचे आहे,’ असे तिने ट्विट केले. तोपर्यंत मोनालीच्या आईवडिलांनी ही बातमी वाचली नव्हती. याचाच उल्लेख तिने पुढच्या ट्विटमध्ये केला. ‘माझ्या पालकांनी अद्याप ही बातमी पाहिली नाही हे नशिब. माझा मृत्यू झाला नसून मी आत्महत्या करण्याचेही काही कारण नाही हे तुम्हाला मी स्पष्ट करतेय,’ अशा शब्दांत तिने ‘आज तक’ला त्यांची चूक लक्षात आणून दिली.

सर्वप्रथम बातमी ब्रेक करण्याच्या स्पर्धेत अनेकदा प्रसारमाध्यमांकडून चुका होताना दिसतात आणि कित्येकदा या चुका अक्षम्य असतात. मोनाली ठाकूरच्या ट्विटनंतर नेटीझन्सकडूनही टीकांचा भडीमार होऊ लागला. निष्काळजीपणा, बेजबाबदारपणा, लज्जास्पद अशा शब्दांत ट्विटरवर नेटीझन्सकडून टीका होऊ लागली. त्यानंतर लगेचच वेबसाईटकडून तो फोटो बदलण्यात आला. वेबसाईटकडून मोनाली ठाकूरची माफी मागण्यात आली की नाही याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.