अमरनाथ हल्ल्यात आपल्या धाडसी वृत्तीने आणि समजूतदारपणाने लोकांचे प्राण वाचवणाऱ्या बसचालकाला सुप्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम पाच लाख रुपयांचे बक्षीस देणार आहे. सलीम शेख असे त्या बसचालकाचे नाव असून त्याच्या धाडसाने प्रभावित होऊन त्याला बक्षीस देण्याचा निर्णय सोनू निगमने घेतलाय. याविषयी सोनू म्हणाला की, ‘अशा प्रकारचे धाडस दाखवणाऱ्यांना सरकार बक्षीस तर देते मात्र अशा लोकांची आर्थिक मदतदेखील केली पाहिजे असे मला वाटते.’ याआधीही सोनू निगमने अशा प्रकारे अनेकांची आर्थिक मदत केली आहे.

जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये सोमवारी संध्याकाळी अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला असून, ३२ लोक जखमी झाले आहेत. अमरनाथ यात्रेकरू ज्या बसमधून परतत होते त्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान बसचा एक टायर पंक्चर झाला होता, तरीही बसचालक सलीम आणि बसचे मालक हर्ष यांनी धाडस आणि समयसूचकता दाखवत ते न थांबता बस चालवत राहिले. जर सलीमने हल्लेखोरांना घाबरून बस थांबवली असती तर अनेक लोकांचे प्राण गेले असते.

salim shaikh
बसचालक सलीम शेख

जम्मू आणि काश्मीर सरकारने सलीमला तीन लाख रुपये बक्षिस म्हणून देण्याची घोषणा केली होती. ‘लष्कर- ए- तोयबा’ने हा हल्ला केल्याचे उघड झाले असून, मूळचा पाकिस्तानचा असलेला कमांडर अबू इस्माईलने या हल्ल्याचा कट रचल्याचा संशय आहे. अमरनाथ यात्रेकरूंवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड अबू इस्माइलचा शोध घेण्यासाठी जम्मू- काश्मीरमध्ये मोहिम राबवली जात आहे. सलीमच्या धाडसावर केवळ त्याच्या कुटुंबियांनाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे.