आजवर मराठी चित्रपटसृष्टीत प्रेमावर आधारित अनेक चित्रपटांची निर्मिती झाली आहे. त्यातच आता आणखी एका चित्रपटाची भर पडली असून राजीव एस.रुईया दिग्दर्शित माझ्या बायकोचा प्रियकर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच यातील एक गाणं तुफान हिट होत आहे.

‘माझ्या बायकोचा प्रियकर’ या चित्रपटातील ‘तू हाथ नको लावूस’ हे गाणे सध्या सोशल मीडियावर हिट ठरते आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायिका स्वाती शर्माने हे गाणं गायलं असून तरुणाईच्या ओठांवर ते गुणगुणताना दिसत आहे. स्वातीने यापूर्वी ‘तनु वेड्स मनू २’ चित्रपटातील ‘बन्नो’ हे गाणं गायलं असून आजही ते श्रोत्यांच्या स्मरणात आहे.

दरम्यान, माझ्या बायकोचा प्रियकर या चित्रपटाच्या निमित्ताने स्वाती शर्माने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. या चित्रपटातील सर्व गाणी स्वातीने एकटीनेच गायली आहेत. विशेष म्हणजे स्वातीच्या ‘तू हाथ नको लावूस’ या गाण्याला सोशल मीडियावर ४ लाखपेक्षा अधिक व्हियूज मिळाले आहेत.

‘तू हाथ नको लावूस’ हे गाणे मीरा जोशी व प्रियदर्शन जाधव यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. राजकला मुव्हीज अँड बाबा मोशन पिक्चर्स प्रा. लि.या बॅनरखाली निर्मिती करण्यात आली आहे. दीपक रुईया, राजेंद्र गोयंका, प्रदीप के शर्मा, अनिता शर्मा, धवल जयंतीलाल गाडा, अक्षय जंयतीलाल गाडा हे निर्माते आहेत. तर रेश्मा कडाकिया, कौशल कांतीलाल गाडा, निरज गाडा हे सहनिर्माते आहेत. हा चित्रपट येत्या २३ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.