बॉलिवूड गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत आदित्य एका एअरलाइन्स कर्मचाऱ्याला शिवीगाळ करताना दिसत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठरावीक वजनापेक्षा जास्त सामान घेऊन जाणाऱ्या आदित्यला विमानतळावर एका कर्मचाऱ्याने रोखले. त्याला अधिक सामानासाठी अतिरिक्त पैसे देण्यास सांगण्यात आले. यावर आदित्यचा पारा चढला आणि त्याने त्या अधिकाऱ्याला सर्वांसमक्ष ओरडण्यास सुरूवात केली.

‘इथे १० लोक आहेत आणि ते पाहत आहेत, आधी तू बोललास की शिवी देऊ नकोस आणि त्यानंतरच मी शिवी दिली. तू मला बोललास की मला शिवी देण्याचा हक्क नाहीये. पण मी तेच बोलणार जे मला बोलायचे आहे.’

आदित्य पुढे म्हणाला की, ‘मला माहितीये इथे सगळे उभे आहेत. पण तू हे फार वैयक्तिक घेतोयस. मी सुरूवातीला तुला शिवी देत नव्हतो. मी माझ्या मित्रांसोबत इथे व्हिडिओ काढत होतो आणि मी जे पाहिजे ते बोलू शकतो. बघा… या माणसाचा अहंकार बघा…’

यानंतर इंडिगोच्या कर्मचाऱ्याला धमकी देताना आदित्य म्हणाला की, ‘तू मला विमानात चढू देणार नाहीस, तर मी तुला मुंबईत पाहून घेईन. कारण मी कधी ना कधी मुंबईत पोहोचेनच ना… तेव्हा पाहू… तुझी चड्डी नाही उतरवली तर माझं नाव आदित्य नारायण नाही.’