कोणाच्याही आयुष्यात लग्न हा एक महत्त्वपूर्ण टप्पा असतो. प्रत्येकजण या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतो. आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत सप्तपदी घेणं आणि त्याच्यासोबतच संसार थाटणं यासारखा आनंद दुसरा कशातच नाही. पण जर त्याच व्यक्तीसोबत पुन्हा एकदा लग्न करण्याची संधी मिळाली तर? हे कसं शक्य आहे असंच तुम्हाला वाटत असेल ना पण हे अभिनेत्री स्मिता जयकर यांच्याबाबतीत शक्य झालं आहे. त्यांनी दुसऱ्यांदा लग्न केले आहे. अचानक स्मिता यांनी दुसऱ्यांदा विवाह का केला असावा असाच प्रश्न अनेकांना पडला असेल.
स्मिता यांनी पती मोहन जयकर यांच्यासोबतच पुन्हा विवाह केला. नुकतीच स्मिता आणि मोहन यांच्या लग्नाला ४० वर्षे पूर्ण झाली. लग्नाचा ४० वा वाढदिवस त्यांनी अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला. पुन्हा लग्न करत या जोडप्याने जुन्या आठवणींना नव्याने उजाळा दिला.
स्मिता जयकर या लग्नसमारंभावेळी अगदी नव्या नवरीप्रमाणे नटल्या होत्या. हातावर मेंदी आणि फुलांच्या मुंडावळ्यांमध्ये स्मिता जयकर फार सुंदर दिसत होत्या.
आता नवरी इतकी नटली म्हटल्यावर नवरदेवही तसा साजेसा हवाच ना… मोहन यांनीही स्मिता यांना साजेशी तयारी केली होती. सतीश शहा, रती अग्निहोत्री, अर्चना नेवरेकर अशा अनेक मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी या अनोख्या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली होती.
स्मिता जयकर यांचे पती मोहन जयकर हे व्यवसायाने वकील आहेत. स्मिता आणि मोहन यांना सिद जयकर आणि मसुमा जयकर ही दोन मुले आहेत. सिद हा फिल्म एडिटर म्हणून काम करतो. शाहरुखच्या ‘रा वन’ या सिनेमासाठी त्याने एडिटींग केले आहे.