कलाविश्वात झगमगाटाच्या या दुनियेपलीकडेही असं एक जग आहे ज्या जगाच्या विळख्यात बरेच सेलिब्रिटी अडकले होते. संपत्ती, यश, काही खासगी प्रश्न या सर्वांमुळे सेलिब्रिटींच्या आयुष्यात लोकप्रियतेसोबतच काही व्यसनांचीही नकळतच एण्ट्री होते आणि मग सर्व काही एका क्षणातच बदलून जातं. बॉलिवूडमध्ये व्यसनांच्या आहारी गेलेल्या अशा काही सेलिब्रिटींची नावं बऱ्याचदा समोर आली आहेत. पण, नुकतच या यादीत एका अनपेक्षित नावाची भर पडली, ते नाव म्हणजे स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा अभिनेता प्रतीक बब्बर.

प्रतीक बब्बरचं नाव असं एकाएकी प्रकाशझोतात येण्यामागचं कारण म्हणजे त्याने नुकतीच दिलेली कबुली. गेल्या वर्षी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत प्रतिकने, आपण अमली पदार्थांच्या आहारी गेल्याची कबुली दिली होती. त्याचदरम्यान या व्यसनाशी कोणत्या प्रकारे लढा दिला होता हेसुद्धा त्याने सर्वांमोर स्पष्ट केलं होतं. एखाद्या अभिनेत्याने आपण व्यसनाधीन गेल्याचं जाहीरपणे मान्य करणं ही बाब अनेकांना धक्का देणारी होती. आता प्रतीक एक पाऊल पुढे गेला असून ‘दिल से आझाद’ या व्हिडिओतून अमली पदार्थांच्या आहारी गेल्यामुळे कोणकोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागला होता हे सादर केलं आहे.

‘ब्लश’ या युट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये प्रतिकच्या आयुष्यातील त्या प्रसंगांवर पुन्हा एकदा प्रकाश टाकण्यात आला आहे ज्याची वाच्यताही तो आता करु इच्छित नाही. याविषयीच वृत्तसंस्थेशी संवाद साधताना तो म्हणाला, ‘या व्हिडिओच्या माध्यमातून मला सर्वांना सांगायचं आहे की, मी काही जन्मत:च व्यसनाधीन नव्हतो. कोणीही सवय लावून घेण्यासाठी ड्रग्ज घेत नाही. किंबहुना या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी मी खूप मेहनत घेतली. आताच्या घडीला ड्रग्सचा तो काळ म्हणजे माझ्या आयुष्यातील फार वाईट काळ आहे.’

वाचा : … म्हणून स्मिता पाटील अन्नू कपूर यांना सोडायला थेट विमानतळापर्यंत गेल्या होत्या

ड्रग्सच्या सवयीतून सावरलेल्या प्रतीकचा हा व्हिडिओ सध्या अनेकांचीच मनं जिंकतोय. प्रतिकनेच या व्हिडिओतील गाणं गायलं असून, राधिका आनंद आणि संध्या डेसी सुंदरम यांनी ते लिहिलं आहे. अंकुर श्रीवास्तवने मोठ्या कौशल्याने त्याला संगीत दिलं असून त्यात कुठेच भडकपणा दिसत नाहीये. गेल्या बऱ्याच वर्षांपासून प्रतिक चित्रपटांत झळकला नाहीये. पण, सध्या मात्र तो फिटनेसवर पूर्ण लक्ष देत असून, पुन्हा एकदा चित्रपटांमध्ये येण्याची कसून तयारी करत आहे.