सोशल मीडियावर आपली बाजू ठामपणे मांडणाऱ्या आणि नेहमीच रोखठोक वक्तव्य करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत येणारं एक नाव म्हणजे ट्विंकल खन्ना. अभिनय क्षेत्राला बऱ्याच वर्षांपूर्वी रामराम केल्यानंतरही ट्विंकलचा कलाविश्वातील वावर मात्र कायम आहे. सध्या तिने आपला मोर्चा लेखनाकडे वळवला असून, विविध सदरं लिहिण्यासाठी ती योगदान देते. त्याशिवाय ट्विंकलच्या ट्विट्स आणि वक्तव्यांचीही सोशल मीडियावर बरीच चर्चा असते. अशाच एका वक्तव्यामुळे ट्विंकल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर होणारं ट्रोलिंग हे म्हणजे एखाद्या झुरळासारखं आहे, असं मत तिने मांडलं. एका कार्यक्रमादरम्यान ती बोलत होती.

सोशल मीडिया ट्रोलिंगविषयी आपलं मत मांडत ती म्हणाली, ‘हे लोक (ट्रोलर्स) प्रत्येक अशा व्यक्तीची खिल्ली उडवतात जे लोक त्यांच्या खिल्ली उडवण्याकडे जास्त गांभीर्याने पाहतात. खरंतर त्यांच्याकडे आवाजवी लक्ष देणारे लोकच जास्त मूर्ख असतात. सोशल मीडियावर होणारं ट्रोलिंग हे एखाद्या झुरळाप्रमाणे असतं. त्यावर स्प्रे मारला की ते लगेचच आपल्या मार्गातून नाहीसे होतात. ही झुरळं मार्गातून दूर करण्यासाठी तुम्हाला त्यावर स्प्रे मारत राहणंच गरजेचं आहे’, असं ट्विंकल म्हणाली. या कार्यक्रमात बरेच दिग्गज उपस्थित होते.

वाचा : सेक्सी दुर्गा चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे अन्यायाविरोधात पंतप्रधानांना पत्र

आपली निंदा करणाऱ्यांची मतंही आपण ऐकतो, असंही तिने यावेळी स्पष्ट केलं. ‘माझी निंदा करणाऱ्या वक्तव्यांकडेही मी तितकंच लक्षपूर्वकपणे पाहते. कारण बऱ्याचदा त्यातही काही पटण्याजोग्या गोष्टी असतात, त्या माध्यमातून मला माझ्याभोवती असणाऱ्या काही गोष्टींविषयीसुद्धा महत्त्वाची माहिती मिळते’, असं तिने स्पष्ट केलं. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच सेलिब्रिटींना ट्रोलिंगचा शिकार व्हावं लागलं आहे. एखादा फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतरही काही नेटिझन्स सवयीनुसार सेलिब्रिटींवर निशाणा साधत त्यांच्यावर टीकेची झोड उठवणं चालूच ठेवतात. त्या सर्वांसाठीच ट्विंकलने दिलेलं हे उत्तर म्हणजे एक चपराक ठरली आहे.