सैफ अली खानची बहिण आणि बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान गरोदर असल्याचे आपल्या सर्वांना माहितीच आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने सोहाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सोहाचा बेबी बंप स्पष्ट दिसून येतोय. ३८ वर्षीय सोहाने या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ‘गरोदर असताना स्वस्थ राहू शकत नाही असं कोण म्हणतं?’ त्याचबरोबर आणखी एका फोटोच्या कॅप्शनमध्ये चाहत्यांना एक संदेशदेखील दिला आहे. यामध्ये ती म्हणतेय की, ‘या आंतरराष्ट्रीय योग दिनी फोटोग्राफरसाठी नव्हे तर स्वत:साठी पोझ द्या.’
२५ जानेवारी २०१५ रोजी सोहा आणि कुणाल लग्नबंधनात अडकले. मे महिन्यात दोघे ‘बेबीमून’साठी लंडनलाही गेले होते. त्यावेळीसुद्धा दोघांनी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यावेळी पहिल्यांदा बेबी बंपसोबत सोहा या फोटोंमध्ये दिसली. सोहा आणि कुणालने ‘९९’ आणि ‘ढुंढते रह जाओगे’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. ‘रंग दे बसंती’, ‘साहेब बीवी और गँगस्टर रिटर्न्स’, ‘दिल मांगे मोर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये सोहाने भूमिका साकारली. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘३१ ऑक्टोबर’ या चित्रपटानंतर ती कोणत्याच चित्रपटांमध्ये झळकली नाही. तर, कुणाल सध्या दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या आगामी ‘गोलमाल अगेन’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
वाचा : श्रिया चालवतेय सचिनचा ‘हा’ वारसा
मागील वर्षी डिसेंबरमध्ये सोहाची वहिनी आणि अभिनेत्री करिना कपूरने मुलगा तैमूरला जन्म दिला. करिना कपूर आपल्याला खूप सारे टिप्सही देत असल्याचे सोहाने म्हटले होते. ‘करिना कपूर, आई शर्मिला आणि इतरही जवळचे व्यक्ती मला नेहमीच गरोदरपणा आणि मातृत्त्वाविषयीच्या टिप्स देत असतात. करिनाच्या सूचनांचा मला नेहमीच खूप फायदा होतो. माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरे मी करिनाकडूनच मिळवते. मी काय खावे, काय खाऊ नये यांसारखे अनेक टिप्स ती मला देते,’ असं सोहा म्हणाली.