२०१८ मध्ये गायिका सोना मोहपात्राने #MeToo मोहिमेअंतर्गत प्रसिद्ध गायक अनु मलिक यांच्यावर गैरवर्तन केल्याचे आरोप केले होते. तिच्या या आरोपांनंतर अनु मलिक यांना ‘इंडियन आयडॉल १०’ मध्येच सोडून द्यावं लागलं होतं. मात्र आता इंडियन आयडॉलच्या नव्या पर्वामध्ये ते पुन्हा परिक्षकांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. सोना अनेक वेळा त्यांच्यावर निशाणा साधत असून यावेळी तिने तिचा मोर्चा गायक सोनू निगमकडे वळविला आहे.

गायिका सोना मोहपात्राने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध गायक सोनू निगम याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सोनाने ट्विटवर एक पोस्ट शेअर करत सोनू आरोप केले आहेत. ‘सोनूने माझ्या पतीला राम संपथला फोन करुन तुझ्या पत्नीला नियंत्रणात ठेव असं सांगितलं’. यापूर्वीही #MeToo प्रकरणी सोनू निगमने अनु मलिकला पाठिंबा दिल्यामुळे सोनाने त्याच्यावर ताशेरे ओढले होते.

एका नेटकऱ्याने सोनाला टॅग करत, गेल्या वर्षी #MeToo अंतर्गंत अनु मलिक यांच्यावर आरोप करण्यात आले होते. मात्र आता ते पुन्हा इंडियन आयडॉलच्या नव्या पर्वात दिसून येत आहे. थोडक्यात #MeToo मध्ये ज्या कलाकारांवर आरोप करण्यात आले होते. ते पुन्हा या क्षेत्रामध्ये कार्यरत होताना दिसत आहेत. त्यामुळे महिलांनी ज्या आत्मविश्वासाने ही मोहिम सुरु केली होती ही वाया गेली, असं ट्विट एका युजरने केलं होतं. त्यावर उत्तर देताना सोनाने स्पष्टीकरण देत सोनू निगमवर निशाणा साधला आहे.

गायक, संगीतकार सोनू निगमने माझ्या पतीला राम संपथ यांना त्यावेळी  फोन करुन तुमच्या पत्नीला सोनाला नियंत्रणात ठेवा असं सांगितलं. “सोनू निगमने #MeToo प्रकरणी अनु मलिक यांना पाठिंबा दिला होता. सोबतच सोनू निगमने अनु मलिक यांना नॅशनल टीव्हीवर लाखो रुपये कमाविण्याचा अधिकार असल्याचं सांगितलं होतं. इतकंच नाही तर अनु मलिक माझ्या भावासारखा असल्याचंही त्याने म्हटलं होतं. विशेष म्हणजे मला #MeToo मोहिमेचं महत्त्व समजतं अस सांगितलं होतं. मात्र तरीदेखील त्यांनी माझ्या पतीला राम संपत यांना फोन करुन मला नियंत्रणात ठेवायला सांगितलं होतं. इतकंच नाही तर मला दहशतवादीही म्हटलं होतं”, असं सोनाने ट्विट करुन सांगितलं.