‘एक सुंदर शहर आपलं आयुष्य देखील सुंदर करू शकतं! अशा काही जागा सुंदर असतातच पण त्या संस्मरणीय व्हायला माणसचं लागतात.’ अशा अतिशय अनवट धाग्यावर बेतलेला आगामी मराठी चित्रपट म्हणजे ‘हंपी’. या चित्रपटात हंपी हे फक्त एक शहर नसून एक अतिशय सकारात्मक असं व्यक्तिमत्त्व आहे. शिवाय अशा अभिनव आणि प्रभावी कल्पनांमुळेच मराठी चित्रपटसृष्टीची उच्च अभिरुची अधोरेखित होत आली आहे.
वाचा : … म्हणून तुषार कपूरने मुलाच्या जन्मासाठी सरोगसीचा मार्ग निवडला
‘हंपी’, या नवीन कलाकृतीचं ‘ग्लॅमरस’ आणि ‘फ्रेश-लूक’ असलेलं पोस्टर आणि टिझर आतापर्यंत सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच पार पडला. चित्रपटात निराशाग्रस्त ईशा (सोनाली कुलकर्णी) ट्रिप म्हणून हंपीला येते आणि तिच्या आयुष्यात आमूलाग्र बदलत होतात. मुळात ती हंपीला का जाते, तिथे ती काय करते, तिला तिथे कोण आणि कसे लोक भेटतात याची उत्तरं अर्थातच यथावकाश चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच प्रेक्षकांना मिळतील.
ईशा, हंपी मधल्या माणसांमुळे बदलते की हंपी मुळे बदलते हा कुतूहलाचा विषय जरी असला तरी ऐतिहासिक वास्तूचा दर्जा असलेले हंपी हे ठिकाण कोणालाही प्रेमात पडायला लावणारे असे आहे. हंपी ही प्रेमकथा आहे की इतरांपेक्षा स्वतःलाच स्वतःच्या प्रेमात पाडणारी कलाकृती आहे, की या दोन्ही गोष्टींचा सुंदर मिलाफ आहे हे अदिती मोघे यांच्या सुंदर कथा-पटकथा-संवाद आणि प्रकाश कुंटे यांच्या दिग्दर्शनातून उलगडत जाईल.
वाचा : ‘साहो’साठी प्रभासची जीवाची बाजी!
‘हंपी’ चित्रपटात सोनाली कुलकर्णी, प्रियदर्शन जाधव, प्राजक्ता माळी, ललित प्रभाकर, छाया कदम अशी तगडी आणि ग्लॅमरस स्टारकास्ट आहे. येत्या १७ नोव्हेंबरला हंपी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल आणि प्रेक्षकांना पाहता पाहता हंपीला घेऊन जाईल.