मराठीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पाच महिन्यांनी दुबईहून मुंबईला परतली आहे. लॉकडाउनपूर्वी सोनाली तिच्या होणाऱ्या पतीला भेटण्यासाठी आणि काही दिवस सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी दुबईला गेली होती. मात्र त्यानंतर लगेच लॉकडाउन घोषित झाल्यामुळे ती तिथेच अडकली. कुणाल बेनोडेकरसोबत सोनालीचा साखरपुडा झाला असून हे दोघं लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
मुंबईला परत येणार असल्याची माहिती सोनालीने एक फोटो पोस्ट करत दिली. ‘करोनाच्या प्रादुर्भावामुळे मी दुबईत अडकले आणि घरापासून लांब होते. आता घरी परतण्याची वेळ आली आहे. दुबई आणि भारत या दोन्ही सरकारने आखून दिलेले सर्व नियम व अटींचं पालन मी करतेय. कोविड १९ची माझी चाचणीसुद्धा झाली असून रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे मी विमानातून प्रवास करू शकते. तुम्हा सर्वांना लवकरच भेटेन’
https://www.instagram.com/p/CDs3vx3gAAb/
दुबईत असतानाही सोनाली सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात होती. तिने अनेक फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. या पाच महिन्यांच्या काळात सोनाली व तिच्या होणाऱ्या पतीने मिळून एक फिटनेस चॅलेंजसुद्धा स्वीकारला होता. तर दुबईतून तिने काही व्हिडीओसुद्धा पोस्ट केले होते.