प्रत्येक अभिनेता किंवा अभिनेत्री आपली भूमिका अधिक प्रभावी होण्यासाठी खास प्रयत्न करतात. कोणी वजन वाढवतं, कुणी वजन कमी करतं, कुणी सिक्स पॅक अॅब्ज करतात, तर कुणी आपल्या लुकवर लक्ष देतात. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने प्रकाश कुंटे दिग्दर्शित आगामी ‘हंपी’ या चित्रपटातील भूमिकेसाठी स्पेशल हेअर कट केला आहे. तिच्या या हेअर कटमुळे तिचा लूकच बदलला आहे.

वाचा : वैभव-प्रार्थनाचं लागणार ‘व्हॉट्सअप लग्न’

वेगळा लूक मिळाल्याने सोनालीही खुश होती. ‘आजपर्यंत मी कधीच माझे केस इतके कमी केले नव्हते. त्यामुळे मला केस कापवेसेही वाटत नव्हते. माझ्या या भूमिकेसाठी शॉर्ट केस असावेत, ही प्रकाशचीच कल्पना होती. या भूमिकेत मी आधीपेक्षा वेगळं दिसावं अशी असं त्याला वाटत होतं. माझी भूमिका, ईशा ही टॉम बॉय आहे. तिच्या आनंद शोधण्याची गोष्ट या चित्रपटात आहे. ती शोधत असलेला आनंद तिला हंपीमध्ये सापडतो का, हे चित्रपटात पहायला मिळेल. ही भूमिका साकारता खूप मजा आली,’ असे सोनालीने सांगितले.
सोनालीच्या लुकविषयी प्रकाश म्हणाला की, ‘सोनालीच्या आजवरच्या भूमिकांचा प्रभाव या भूमिकेवर नको होता. त्यामुळे तिचा लूक बदलणे महत्त्वाचे होते. तिला ‘गर्ल नेक्स्ट डोअर’ असा लूक द्यायचा विचार होता. त्यासाठी शॉर्ट केस आणि चष्मा असा लूक समोर आला. सोनालीनेही त्यासाठी तयारी दाखवली आणि आमचे काम सोपे झाले.’

वाचा : बाप रे बाप! कायलीचे होणारे बाळ नक्की कोणाचे?

या चित्रपटात सोनाली कुलकर्णी सोबत अभिनेत्री प्राजक्ता माळी,अभिनेता प्रियदर्शन जाधव, ललित प्रभाकर अशी उत्तम कलाकार मंडळी आहेत. येत्या ३ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. स्वरूप समर्थ एण्टरटेनमेन्टच्या योगेश निवृत्ती भालेराव आणि डिजिटल डिटॉक्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, चैतन्य गिरीश अकोलकर यांनी प्रस्तुती केली आहे. चित्रपटाचं लेखन आदिती मोघेनं, दिग्दर्शन प्रकाश कुंटेनं आणि सिनेमॅटोग्राफी अमलेंदू चौधरी यांची आहे.