अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या प्रकृतीत सुधारणा होत असून उपचारपद्धती व्यवस्थित चालू असल्याची माहिती तिच्या पतीने दिली आहे. ट्विटरच्या माध्यमातून सोनालीचा पती गोल्डी बहलने चाहत्यांना ही माहिती दिली आहे. गेल्याच महिन्यात तिनं आपल्याला हाय ग्रेड कॅन्सर निदान झाल्याचं सोशल मीडियावरून सांगितलं होतं. त्यानंतर कलाविश्वातील मंडळी आणि लाखो चाहतेसुद्धा सोनाली लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.
‘सोनालीला मिळणाऱ्या प्रेमाबद्दल आणि सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तिची प्रकृती ठीक असून कोणत्याही अडचणींविना तिच्यावर उपचार सुरू आहेत. हा खूप मोठा प्रवास आहे पण त्याची सुरुवात सकारात्मक झाली आहे,’ असं ट्विट गोल्डी बहलने केलं.
Thank you all for the love and support for Sonali… she is stable and is following her treatment without any complications. This is a long journey but we have begun positively.
सोनाली बेंद्रे सध्या परदेशात कॅन्सरवर उपचार घेत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनाली चाहत्यांच्या संपर्कात आहे. ज्यामध्येच काही दिवसांपूर्वी तिचा मुलासोबतचा फोटो सर्वांचं लक्ष वेधून गेला. आजारपणात मुलगाच आपला प्रेरणास्त्रोत असून, त्याच्याकडे पाहूनच आपल्याला या आजाराशी लढण्यासाठी ताकद मिळत असल्याचंही तिने या पोस्टमध्ये म्हटलं होतं. प्रत्येक दिवशी एक नवीन आव्हान आणि नवीन विजयाला मी सामोरी जात आहे. या प्रवासात माझा सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवण्याचा मी प्रयत्न करत आहे, असंही तिने एका पोस्टमध्ये म्हटलं होतं.